वेदांताच्या ई-लिलाव झालेल्या खनिजाची वाहतूक सुरू

कमी केलेल्या कामगारांना आळीपाळीने घेण्याचे कंपनीचे आश्वासन


12th November 2019, 05:37 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

फोंडा : खाण बंदीनंतर कामावरून कमी केलेल्या किर्लपाल-दाभाळ पंचायत क्षेत्रातील कामगारांना पुढील सोमवारपासून आळीपाळीने कामावर घेण्याचे  आश्वासन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याने सोमवारी ई-लिलाव झालेल्या वेदांता कंपनीच्या खनिज मालाची वाहतूक सुरळीतपणे चालू झाली. स्थानिक पंचायत मंडळाने कंपनीच्या व्यवस्थापकांशी बोलणी करून कामगारांसाठी मध्यस्थी केल्यानंतर ही वाहतूक सुरू झाली.             

गेल्या काही काळापासून कामावरून कमी केलेल्या कामगारांना कंपनीतर्फे अर्धा पगार दिला जात होता. मात्र, त्यांना कामावर घेतले नव्हते. कायद्याने ९० दिवस कामावर गैरहजर राहिल्यास नोकरी धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे कामगार धास्तावले होते. मात्र, कंपनी व्यवस्थापनातर्फे कामाच्या उपलब्धतेप्रमाणे सदर कामगारांना आळीपाळीने रूजू करून घेण्याचे आश्वासन दिल्याने तूर्त हा प्रश्न सुटल्याचे किर्लपाल-दाभाळचे उपसरपंच शशिकांत गावकर यांनी सांगितले.            

सोमवारी सकाळी उपसरपंच शशिकांत गावकर यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच आणि विद्यमान पंचायत सदस्य रमाकांत गावकर, मोहन गावकर, कालिदास गावकर तसेच तुळशीदास गावकर आणि  भानुदास गावकर या शिष्टमंडळाने कंपनीचे अधिकारी रामा सावंत यांची भेट घेऊन कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली.  त्यानंतर कंपनीतून सुमारे २५० ते ३०० ट्रक खनिजमाल कोडली येथून आमोणापर्यंत नेण्यात आला. त्यानंतरही दिवसभर वाहतूक सुरूच होती.