भू संपादनाअभावी रखडले महामार्गाचे काम

‘साबांखा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती; महामार्गाच्या खड्ड्यांबाबत कंत्राटदारच घेईल निर्णय


12th November 2019, 05:36 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                        

पणजी : राज्य सरकारने केंद्राला सुमारे ३० टक्के जमीन संपादन न करून दिल्यामुळेच पत्रादेवी-बांबोळी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम रखडले होते. पण राज्य सरकारकडून जमीन संपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून, यापुढे या कामाला अधिक चालना मिळेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (साबांखा) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.                  

महामार्गाच्या रुंदीकरणासाठी जमीन उपलब्ध करून देणे, केंद्र सरकारने नेमलेल्या पर्यवेक्षक एजन्सीवर नियंत्रण ठेवणे आणि एजन्सीला पैसे देणे इतकीच भूमिका राज्य सरकारची असते. कामाचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराला कामाचे पूर्ण अधिकार असतात. त्यात राज्य सरकार कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. महामार्ग रुंदीकरणासाठी राज्य सरकारने निश्चित केलेल्या जमीन संपादनाला काही स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी आक्षेप घेत न्यायालय गाठले आहे. काही ठिकाणी लोकांकडून दबाव येत होता. त्यामुळे निश्चित केलेल्यापैकी सुमारे ३० टक्के जमिनीचे संपादन झालेले नव्हते. पण आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या कामाला गती मिळून डिसेंबर २०२० पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.                   

पत्रादेवी ते करासवाड्यापर्यंतच्या मार्गावरील उड्डाणपुलांचे काम वेगाने सुरू आहे. हे काम मे २०२० पर्यंत पूर्ण होईल. याशिवाय महामार्गावरील खड्डेही सिमेंट काँक्रीटद्वारे बुजविण्यात येत आहेत. राज्यात यंदाच्या मान्सून हंगामात सर्वाधिक पाऊस पडला. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्यात कंत्राटदाराला अपयश आले. त्याचा फटका नागरिक तसेच वाहन चालकांनाही सहन करावा लागला, असे हा अधिकारी म्हणाला. महामार्गासाठी सुमारे ४० घरे गेली आहेत, त्या कुटुंबांना राज्य सरकार लवकरच प्लॉट देणार आहे. शिवाय त्यांच्यासाठी वीज, पाण्याचीही व्यवस्था करणार आहे. याशिवाय काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गाची पुन्हा कधीही खोदाई करावी लागू नये, यासाठी जलवाहिन्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी टाकण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कंत्राटदाराचा गलथान कारभार

केंद्रीय महामार्ग मंत्रालयामार्फत पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतच्या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पण हे काम अगदी संथगतीने सुरू आहे. शिवाय या मार्गावर खड्डेच खड्डे असल्याने वाहन चालकांना त्यावरून वाहने हाकणे कठीण बनले आहे. मान्सूनच्या मुसळधार पावसाने खड्ड्यांचा आकार वाढविल्याने या काळात काही वाहन चालकांचा या मार्गावर मृत्यू झाला होता. तर अनेकांचे छोटे-मोठे अपघातही झाले होते. महामार्गाचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराने रुंदीकरण कामावेळी कोणतेही गांभीर्य दाखविलेले नाही. वाहन चालकांसाठी सूचना फलकही लावण्यात आलेले नाहीत.

‘भूमी राशी पोर्टल’चा राज्याला फायदा                

केंद्राच्या ‘भूमी राशी पोर्टल’वर महामार्गाच्या कामासंदर्भातील जमिनींची सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे या कामात पारदर्शकता आली असून, नागरिकांनी ही कागदपत्रे कधीही पाहता येणार आहेत. सरकारलाही या पोर्टलचा मोठा लाभ होणार आहे, अशी माहितीही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.