कर्तव्यदक्ष आयुक्त शेषन

Story: अग्रलेख-२ |
12th November 2019, 06:00 am

कठोर आणि शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून देशाला परिचित झालेले माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांची कारकीर्द केवळ वादळी होती असे म्हणता येणार नाही, तर त्याला विविधतेची किनार लाभली होती. आयएएस अधिकारी असलेले शेषन एक सच्चे पर्यावरणप्रेमी होते, त्यामुळे ते नेहमी हिरवी टोपी वापरत असत. त्यांची प्रशासकीय कारकीर्द केंद्रात पर्यावरण सचिव म्हणून सुरू झाल्याने कदाचित त्यांना पर्यावरणाबद्दल आस्था असावी. चंद्रशेखर पंतप्रधानपदी असताना डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी कायदा मंत्री होते, त्या अल्पकाळात निवडणूक आयुक्तपदी शेषन यांची नियुक्ती करण्यामागे डॉ. स्वामींचे प्रयत्न होते. त्यापूर्वी शेषन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात कॅबिनेट सचिव या महत्त्वाच्या पदावर होते. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचा कालावधी विशेष गाजला, कारण नावापुरती असलेली आचार संहिता त्यांनी प्रत्यक्षात कडकपणे राबविली. लोकशाही मूल्ये आणि निवडणूक सुधारणा यावर त्यांनी सतत भर दिला. सहा वर्षांत त्यांनी आयोगाचा चेहराच बदलला. केवळ निवडणूक घेणारी यंत्रणा ही प्रतिमा बदलून नियमांवर भर देत अतिशय कठोरपणे राजकारण्यांवर वचक ठेवणारा आयुक्त ही त्यांची खरी ओळख आहे. ‘नाश्त्याला मी राजकारण्यांना खातो’ असे ते विनोदाने म्हणत असत, खरे तर त्यांचा तसा दराराच निर्माण झाला होता. जातीधर्माचे राजकारण किंवा तशा प्रकारची वक्तव्ये आणि भाषणे यांना त्यांनी पूर्णपणे आवर घातला होता. निवृत्तीनंतर स्वत: दोन वेळा निवडणुकीत पराभूत झालेले शेषन कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आदर्श होते, पारदर्शकतेवर भर देणारे होते. त्यांचे अनुकरण करणेही सोपे नाही.