मूल्य शिक्षणात ‘राष्ट्रभक्ती’ संस्काराचे महत्त्व !

युद्धाव्यतिरिक्त इतर जागतिक आर्थिक, आैद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आक्रमणाविरूद्धही आपल्याला लढाई जिंकता येईल. या सर्व बाजू पाहता राष्ट्रभक्ती ह्या संस्कारमूल्याची महती आपल्याला कळून येईल.

Story: ज्ञानसरिता । प्रा. सुरेंद्र वसंत सिरस� |
12th November 2019, 06:00 am

आपल्या देशाप्रती असलेल्या निष्ठेला व प्रेमाला ‘राष्ट्रभक्ती’ म्हणता येईल. राष्ट्रभक्ती म्हणजे देशाविषयी असलेले ‘नितांत प्रेम! प्रेमाची अंतिम सीमा म्हणजे भक्ती! आपल्या राष्ट्राप्रती असलेले हे एक प्रेरक आणि श्रेष्ठ संस्कार मूल्य आहे. आपला देश सामर्थ्यशाली झाला पाहिजे. समृद्ध झाला पाहिजे ही प्रेरणा याच संस्कारमूल्यांतून माणसाला मिळते. ‘देश’ म्हणजे केवळ एखाद्या प्रदेशाच्या मर्यादित भाैगोलिक सीमा नव्हेत. देश म्हणजे त्या देशातील माणसे त्यांची संस्कृती, परंपरा, चालीरीती, निसर्ग, इतिहास, कला, राष्ट्रीय प्रतिके, इतिहास, देशबांधवांप्रती सलोखा, मानवी कल्याण, त्यांची प्रगती, समृद्धी म्हणजेच राष्ट्राची प्रगती! म्हणून देशाच्या कल्याणासाठी संरक्षणासाठी झटणे व कार्यरत रहाणे हे प्रत्येक देशवासियाचे कर्तव्य आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे राष्ट्रहितात माझे हित आहे, राष्ट्राच्या कल्याणात माझे कल्याण आहे आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेत माझी सुरक्षितता आहे! हीच प्रत्येक देशवासियांची भावना असली पाहिजे! त्यामुळेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक राष्ट्रभक्तांनी क्रांतिकारकांनी व महान नेत्यांनी आत्मबलिदान केले, हाैतात्म्य पत्करले हे आपण सर्वानीच जाणून घेतले पाहिजे.
‘देशभक्ती’ ही काही ठराविक लोकांचीच मक्तेदारी नव्हे, देशातील प्रत्येक नागरिक हा ‘देशभक्त’ असतो. प्रत्येक नागरिकाच्या हृदयात हा माझा देश आहे. ही माझी जन्मभूमी आहे, मातृभूमी आहे ह्या भावनेची ज्योत अंतर्यामी तेवत असते. या भावनेला साद घालणे आवश्यक आहे. या सादेला प्रतिसाद नक्कीच मिळेल याबद्दल कुणाच्याही मनात शंका येण्याचं कारण नाही. परंतु त्याचबरोबर देशावर संकट आेढवले, आक्रमण झाले तर त्यापुरती देशाप्रती निष्ठा दाखवून भागणार नाही. तर अशा वेळी देशांतील सर्व नागरिकांनी एकजुटीने या समस्यांचा प्रतिकार तर केलाच पाहिजे पण त्याचबरोबर देशाच्या सार्वभौमत्वाला ही धक्का पोचणार नाही याचीही खबरदारी घेतली पाहिजे. देशभक्ती आपल्या हृदयांत सदैव असेल तर कुठल्याही क्षेत्राच्या जागतिक स्पर्धेत आपल्याला टिकून राहता येईल. युद्धाव्यतिरिक्त इतर जागतिक आर्थिक, आैद्योगिक सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आक्रमणाविरूद्धही आपल्याला लढाई जिंकता येईल. या सर्व बाजू पाहता राष्ट्रभक्ती ह्या संस्कारमूल्याची महती आपल्याला कळून येईल.
आपला देश आणि समाज विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महान आणि थोर व्यक्तीमुळे संपन्न झालेला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके, भगत सिंग, सुखदेव, वीर सावरकर,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आगरकर, महात्मा गांधी अशा अनेक वंदनीय क्रांतिकारकांमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशासाठी बलिदान दिलेल्या व निरनिराळ्या मार्गांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी झटलेल्या शांत व अज्ञात असा सर्वांचाच नामोल्लेख करणे जागेअभावी अशक्य असल्याने उपरोल्लिखित काहींचा उल्लेख येथे केला आहे. आैद्योगिकरणाची कास धरत देशाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या, सामाजिक एेक्यासाठी कार्य करणाऱ्या उद्योगपतींचा आणि नेत्यांचा उल्लेखही या ठिकाणी केलेला नाही याची नोंद घ्यावी.
आपल्या राष्ट्राशी किंवा देशाशी तन-मन धनपूर्वक जास्तच जास्त एकरूप होणे म्हणजे राष्ट्रभक्ती किंवा देशभक्ती असं म्हणता येईल. म्हणूनच प्रत्येकाने स्वीकारलेले किंवा त्याचेवर सोपवलेले कार्य प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे, कर्तव्यबुद्धीने आणि तत्परतेने करणे म्हणजेच ‘राष्ट्रभक्ती’ किंवा देशभक्ती होय! आपल्या भारत देशाला फार मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण, विज्ञान कला, साहित्य ही आपल्या भारतीय संस्कृतीची अंगे आहेत. संस्कृतीच्या या सर्व अंगाचा अभ्यास करून त्याबद्दल आस्था, श्रद्धा प्रेम बाळगणे हे आपल्या राष्ट्रभक्तीचे किंवा देशभक्तीचे द्योतक आहे. प्रत्येक राष्ट्राची किंवा देशाची काही प्रतिके असतात. मानचिन्हे असतात. राष्ट्रीय प्रतिके किंवा मानचिन्हे म्हणजे प्रामुख्याने देशाचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत. प्रत्येक राष्ट्राला स्वत:च्या ध्वज असतो. त्या राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात हा राष्ट्रध्वज एकात्मतेची व देशभक्तीची भावना निर्माण करतो. देशाचा हा ध्वज फडकत राहावा यासाठी देशातील अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे हे आपणा सर्वांस माहीत आहे.
राष्ट्रगीत म्हणत असतानाही आपल्या मनात एकात्मतेची भावना निर्माण होते. एका सुरात म्हटलेले राष्ट्रगीत आपल्या मनात एकतेची व राष्ट्रीयत्वाची ऊर्जा निर्माण करीत असते. राष्ट्रध्वज फडकावल्या बरोबर राष्ट्रगीत म्हटले जाते, तेव्हा प्रत्येकाच्या मनात राष्ट्रीय एकात्मतेचा व सहिष्णुतेचा संदेश निर्माण करीत असतो. रविन्द्रनाथ टागोरांनी रचलेले ‘जणगणमन’ हे आपले राष्ट्रगीत किंवा हिंदु्स्थानच्या फाळणीपूर्वी सर महंमद इक्बाल यांनी लिहिलेले ‘सारे जहांसे अच्छा’ हे गीत प्रत्येक भारतीयांच्या हृदयात राष्ट्रभक्ती आणि राष्ट्राभिमान निर्माण करीत असते. राष्ट्रीय मूल्यांना हानिकारक असे वर्तन न करणे ह्या गोष्टीचा देखील राष्ट्रभक्तीत समावेश होतो.
आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण त्यानंतर आपलेच लोक स्वकीयांची पिळवणूक व छळ करीत असल्याचे दृश्य सर्रासपणे पहाव्यास मिळते. देशातील विकृत व विध्वसंक शक्तीच्या छाया सर्व सामान्य माणसाच्या मनावर पडलेल्या दिसतात. त्यामुळे जीवनांची निश्चिती बेभरवशाची झाली आहे. स्वार्थ, लाचलुचपत यांना मर्यादा राहिलेली नाही. राष्ट्रीय मालमत्तेची, स्मारकांची नासधूस करण्याचे प्रमाणही वाढले आहे. या परिस्थितीची नोंद घेऊन अशा दुष्ट प्रवृतीबद्दल व वाईट गुणांबद्दल चीड निर्माण होऊन त्यांचे पारिपत्य केले पाहिजे. कारण राष्ट्रीय मूल्यांना हानिकारक असे वर्तन करू न देणे, शिवाय स्वदेशी वस्तूंचा वापर करणे, देशाच्या साधन-संपत्तीचे, सार्वजनिक मालमत्तेचे, राष्ट्रीय व एेतिहासिक स्मारकांचे, प्रार्थनामंदिराचे संरक्षण व जतन करणे यासारख्या गोष्टी आचरणात आणणे म्हणजेच राष्ट्रभक्ती करणे होय.
उपरोल्लिखित विवेचनावरून आपल्या ध्यानात येईल की ‘राष्ट्रभक्ती’ किवा देशभक्ती’ म्हणजे अनाकलनीय व अप्राप्य गोष्ट् नसून मुलांवर बालवयांतच योग्य ते संस्कार करणे, त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची मूल्ये रूजवणे गरजेचे आहे. विविध माध्यमांतून मुलांच्या मनांत ‘राष्ट्रभक्तींचे किंवा देशभक्तीचे’ संस्कारमूल्य रूजवल्यावर त्यांच्या वर्तनात बदल अपेक्षित आहेत. राष्ट्रभक्ती किंवा देशभक्ती हे संस्कारमूल्य केवळ शाब्दिक नसून ती आंतरिक वृत्ती आहे. राष्ट्राच्या संरक्षणाकरता व संवर्धनाकरता समर्पणाकरता ‘राष्ट्रभक्ती’ हे संस्कारमूल्य अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे. राष्ट्रभक्तीची किंवा देशभक्तीची भावना शिक्षणातील संस्कारांमधून निर्माण झाली तर देशाच्या विकास संतुलनात्मक जगातील कोणत्याही पुढारलेल्या स्पर्धा करू शकेल. राष्ट्रभक्तीची भावना फक्त आपत्काळातच असून उपयोग होणार नाही. तर ती आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक व्यवहारात तिला आचरण करण्याची गरज आहे. राष्ट्रीय नेते, देशभक्त, क्रांतिकारक याबद्दल त्यांनी आदर बाळगला पाहिजे. त्याच्या कथा, चरित्रे यांचे वाचन केले पाहिजे. इतरांनाही त्याचे वाचन करण्यासाठी त्यांनी उद्युक्त केले पाहिजे. सांस्कृतिक वारसा, निसर्ग, परिसर एेतिहासिक वास्तू, एेतिहासिक वस्तू यांचे संरक्षण करण्याबरोबरच धार्मिक व प्रार्थनास्थळांचे पावित्र्य राखले पाहिजे. या गोष्टीना कोणी हानी पोचवत असेल. तर त्यांना त्यापासून परावृत्त केले पाहिजे. राष्ट्रीय प्रतिके, वारसास्थळे, स्मारके यांचा आदर करण्याबरोबरच आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान बाळगणेही गरजेचे आहे. राष्ट्राच्या संकटकाळी, मग ते संकट राष्ट्रीय असो व नैसर्गिक आपत्ती असो, त्याचेही सर्वतोपरी सामना केला पाहिजे. प्रदुषण जातीयता, वाढती लोकसंख्या, अंधश्रद्धा आदी राष्ट्रीय समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मुलांच्या वर्तनात असे बदल घडून आले तर राष्ट्रभक्तीचे संस्कारमूल्य रूजवण्याचे कार्य यशस्वी झाले आहे, असं मानता येईल.