दरवळ गंध, सुगंधाचा..

नजरेतलं जग

Story: गौरी भालचंद्र |
09th November 2019, 10:30 am
दरवळ गंध, सुगंधाचा..


-
पूर्ण फुललेलं ते हसरं फूल श्रीगणेशाच्या सोंडेत कसं शोभून दिसतं. पूजेचे तीन दिवस घरात एक सुंदर वास कायम दरवळत राहायचा. कापराचा वास, चंदनाचा मंद दरवळणारा वास, तुपाच्या निरांजनाचा खरपूस, किंचित जळका वास, उदबत्तीचा धुंद सुगंध आणि कितीतरी प्रकारच्या फुलांचा संमिश्र सुगंध, गुलाबाचा उग्र, जाईचा मंद, मोगऱ्याचा नाकात भरून राहणारा वास, कमळांचा जाणवेल न जाणवेल असा सूक्ष्म दरवळ. असे कितीक वास घरी पाहुणे आलेले. चवथ संपली तरी ते वास कितीतरी दिवस नाकात रेंगाळत राहायचे.
घरभर मेंदीचा, निलगिरी तेलाचा वास. सकाळी उठल्यावर सुकलेल्या मेंदीला तेल लावून कोमट पाण्याने ती धुवायची. मस्त केशरी, लाल रंगात रंगलेली ती मेंदी बघितली की रात्री जागल्याचा सगळा शीण जायचा. नागपंचमी, राखी पौर्णिमा, दसरा, दिवाळी अशा सणांना मेंदी हवीच. कोन हातात धरून अगदी भराभरा सुंदर नक्षी काढत बघता बघता पूर्ण हात रंगत असे. मनातली मेंदी दरवळत असे.
वाफळता चहा, सोबतीला मंद पाऊस, गाण्यांची मैफल आणि खमंग भज्यांचा आस्वाद या साऱ्याचा एकत्रित वास मस्त वाटतो मनाला. उल्हसित करतो अगदी! गरम उकळत्या तेलात फराळाचं मिश्रण पडताच होणारा आवाज. शेवेचा खमंग वास.
आंबा, फणस, चिक्कू, सीताफळ, केळी, नारळ, पपई, जांभूळ, चिंच, शेवगा, गुलाब, शेवंती, मोगरा, रातराणी, जाई, जुई, तुळस, पुदिना, कढीपत्ता, अळू, लिंब, संत्री, गोकर्ण, अनंत अशा कितीतरी फळांच्या चवी, फुलांचे सुवास वेगवेगळ्या ठिकाणांच्या आठवणी चाळवतात. खूप खूप छान वाटतं.
मातीचा दरवळ. रुचकर मोदकांचा दरवळ. पेटीतून येणारा अत्तराचा वास. ओढ्याच्या कडेने असलेल्या केवड्याचा सुगंध अजूनही मनात दरवळतो. आपण जेव्हा भक्तीच्या रंगात रंगून परमेश्वराची आराधना करतो त्यावेळी भक्तीमय सुगंध दरवळतो.
पावसाळ्यात अनंत फुलला की शाळेचे दिवस, आजीच्या परसातली डबल अनंताची झाडं आठवतात. कधी कधी संध्याकाळी जरा उशिरा बाहेर फिरायला गेलं, की एखाद्या घराच्या बागेतल्या रातराणीचा गंध मला धुंद करतो. सुंदर, नाजूक आणि तनामनाला भुरळ घालणाऱ्या सुवासिक फुलांनी बहरलेले बकुळीचे झाड, सुगंधाने भारलेले आणि भरलेले. पहाटे तसेच एेन संध्याकाळी या झाडाखाली बकुळीचा वर्षाव अनुभवणे म्हणजे सुखद पर्वणीच असते. नक्षत्रांसारख्या सुवासिक फुलांचा सडा पडतो अगदी. बकुळीची ओंजळभर फुले गोळा केली आणि भरभरून त्यांचा सुवास घेतला कि मन प्रसन्न होते.
गजरा केसात माळल्यानंतर सुगंध केसात दरवळत राहतो. कालांतराने फुले वाळू लागतात. पण, सुगंध जात नाही. पाण्यात टाकल्यावर पुन्हा उमलतात इतर फुलांसारखी ही फुले कुजत नाहीत. वाळतात. वाळल्यावरसुद्धा आपला मादक, मंद सुवास कायम राखतात. लहानपणी ही फुले पुस्तकात ठेवायला मला खूप आवडायचे, पुस्तकाचे पान अलगद उलगडताना बकुळीची फुले हाती लागत आणि मन सुगंधित होत असे सुरंगीच्या फुललेल्या फुलांचे पिवळे धमक केशर सुगंधाची उधळण करत असतात. खाली पडलेल्या सुक्या फुलांचा सडाही सुवासिक असतो.
केसाच्या वेणीवर लांबसडक सोडलेल्या किंवा आंबाड्यावर गोलाकार माळलेल्या पिवळ्या धमक गजऱ्याने पाहणाऱ्यांना पाहताच राहावेसे वाटते. केसात दरवळणाऱ्या सुरंगीच्या मनमोहक सुगंधात क्षण अन् क्षण प्रसन्न होतो. गजरा काढला तरी दोन- तीन दिवस हा सुगंध केसात तसाच टिकून राहतो.
पारिजातकाच्या फुलांचा सडा प्रसन्न करून जातो मनाला. पहाटे हा सडा अंगणात पडत असे. फुलांचा रंग पांढरा अन्‌ देठ किंचित केशरी. पारिजातकाकडे पाहून वाटते अगदी की सुगंधी फुलांपाशी क्षणभर उभे राहून तो सुगंध साठवून ठेवायचा. मन प्रसन्न करायचे.
कढीपत्ता टाकताच दरवळणारा तो खमंग वास. फोडणीत कढीपत्ता नसेल तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आणि तो कँटीनमधून दरवळणारा खाद्यपदार्थांचा खमंग वास आपोआप मुलांना तिथे खेचून नेतो.
पुरणपोळीच्या खमंग वासापासून ते अगदी अंबाडीच्या भाजीवर लसणाच्या फोडणीपर्यंत शेकडो वास भूक चाळवतात. पण, माझ्या विशेष आवडीचा वास म्हणाल तर बेकरी मध्ये येणारा गोडसर खमंग वास.. केकचा गोड वास, टोस्ट बटरचा मध्यम गोड वास आणि पॅटिस आणि आतल्या सारणाचा तिखटसर वास. साऱ्यांची स्वतःची अशी स्पेशालिटी असते वासाची. विविध खाद्यपदार्थांचा खमंग वास दरवळतो स्वतःचे असे वैशिष्ट्य घेऊन.
पापड उडदाचा आहे की पोह्याचा की बटाट्याचा कि आणखी कसला हेही तळणीच्या वासावरूनच कळतं. ठरावीक वेळेला ठरलेले अन्नपदार्थ शिजवून त्याचा सुगंध वातावरणात दरवळतो आणि त्या वेळेची, समारंभाची अथवा कार्याची वातावरण निर्मिती होते आणि आपल्या शरीरातील घ्राणेंद्रिय उद्दीपित होऊन भूक लागते अथवा तो पदार्थ खाण्याची इच्छा जागृत होते.
निरनिराळ्या चटण्या, कोशिंबिरी, आमट्या, भाज्या यांचे विशिष्ट गंध आहेत. तळण काढत असतानाही स्वयंपाकघराच्या बाहेर बसलेली व्यक्ती त्या तळणीत पुऱ्या आहेत की वडे-भजी की पापड- कुरड्या-सांडगे हे ओळखते. डोळे बंद करून तिच्या नाकासमोर लोणच्याची किंवा खारातल्या मिरचीची बरणी धरून, वासावरून तोंडाला पाणीही सुटू शकतं. हे झालं नुसतं फोडणी, तळणीच्या गडद वासाबद्दल.
फळे, गोड पदार्थांचा असाच सौम्य वास असतो. उन्हाळ्यात पन्हं किंवा कोकम सरबताच्या नुसत्या वासानेच गार वाटतं. लिंबू, कैरी, चिंचेच्या आंबट वासाने एखादी गर्भवती सुखावते तर लहान मुलं गुलाबजाम, बासुंदी इतकंच काय तर केक किंवा पुडिंगच्या वासाने त्या पदार्थाकडे अक्षरशः धाव घेतात. राईच्या तेलाचा, तुपाचा, सांबार- रस्सम मसाल्यांचा वास, माशाच्या आमटीचा वास... मनाला सुखावून जातो अगदी.
पहिल्या पावसानंतरचा मृद्गंध, उन्हाळ्याच्या आधी मोहोरलेल्या आंब्याचा वास, फुलबागेताला फुलांचा धुंद गंध, नव्या वहीचा कोरा वास, नव्या कापडाचा नवा वास. इतकंच काय तर नव्या चपलांचा चामडी वासदेखील वेगळा भासतो.
खमंग, खरपूस, करपट, गोडसर, आंबट, मसालेदार, कडू या नुसत्या चवी नाहीत तर वासही आहेत. आपण कुठली भाजी शिजवतोय किंवा परततोय हे वासावरून ओळखू शकतो. खरंतर ती शिजवतोय की परततोय हेही वासावरूनच कळतं. एखादी उसळ गोडा मसाला घालून केलीये की मालवणी मसाल्याची की घाटी किंवा इतर कुठल्या मसाल्याची, हे त्या उसळीच्या वासावरूनच ओळखतो आपण. एवढंच कशाला त्या उसळीच कडधान्य देखील शिजवताना त्याला आलेल्या उकळीवरून किंवा कूकरच्या शिट्टीच्या वासावरून ते कडधान्य कुठलं आहे हे कळू शकतं. पूजेचं अथवा कार्यालयातल्या वरण भातातलं वरण हे गोडं वरण आहे की साधं; हे ते उकळतानाच कळतं.
हा सगळा वासाचा तसेच सुवासांचा तर खेळ आहे. आपलं आयुष्यच जणू खाद्यपदार्थांच्या वासाकडे, त्या गंधांनी भरलेल्या वातावरणातच आपण लहानाचे मोठे होतो. त्याचप्रमाणे बऱ्याचशा इतरही अनेक गोष्टींचे गंध सुगंध मनात दरवळत राहतात आणि मनाला खूप मस्त वाटतं. त्या प्रत्येकाचा दरवळ अनुभवताना.
(लेखिका साहित्यिक आहेत.)