प्रामाणिक आत्मकथन

वाचु आनंदे

Story: शब्दभ्रमर |
09th November 2019, 10:28 am
प्रामाणिक आत्मकथन


अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, दुर्गम भागात बालपण घालवूनही हुशारी आणि चिकाटीच्या बळावर शिक्षण मिळवले, बँकेत अधिकारी म्हणून रुजू होऊन स्वकर्तृत्वावर सरव्यवस्थापक पदापर्यंत झेप घेतली. निवृत्ती स्वीकारली परंतु, कष्टप्रद जीवनातून निवृत्त कधी झालेच नाही. दामोदर नारायण उपाध्ये यांची जीवनगाथा खरोखरच स्फूर्तीदायक आहे. ‘गेले ते दिन गेले’ हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचताना प्रत्येक पानातून हे जाणवत राहते.
केरी- फोंडा येथे वेदविद्यासंपन्न उपाध्ये कुटुंबात १९४३ साली त्यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी कसलेही कष्ट उपसण्याची तयारी असलेल्या या मुलाने आधी घरीच आणि नंतर पुण्यात रात्रशाळेत शिक्षण घेतले. सांगलीच्या चिंतामणराव पटवर्धन महाविद्यालयातून बी. कॉम. पदवी मिळवताना ते शिवाजी विद्यापीठातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्याबरोबर बँक ऑफ इंडियातून अधिकारी पदावर काम करण्यासाठी त्यांना बोलावणे आले. पुढे शिकायची इच्छा असली तरी घरची बिकट अार्थिक परिस्थिती बघून त्यांनी नोकरी स्वीकारली. नोकरी करताना आय. सी. डब्ल्यू. ए. पदवी मिळवली. बँकेत जिथे गेले तिथे कामाचा विस्तार आणि बँकेची भरभराट केला, असा हा कार्यतत्पर अधिकारी.
महत्त्वाच्या ​ठिकाणी, माेक्याच्या पदांवर काम करताना आमिषे, मोहाचे क्षण अनेक आले. परंतु, उपाध्ये कधी बधले नाहीत. सत्याच्या वाटेवरून कधी ढळले नाहीत. प्रत्येक ठिकाणी चांगली माणसे जोडली. आमिषांना बळी न पडण्याच्या स्वभावामुळे सदैव बँकेच्या हिताचा विचार केला. या कार्याची पावती म्हणजे त्यांना बँक ऑफ ​इंडियातून इंग्लंडमध्ये मँचेस्टर आणि बर्मिंगहॅम येथे नऊ वर्षे काम करण्याची संधी मिळाली. बदलीची वेळ येताच परदेशात चालून आलेल्या चांगल्या संधी धुडकावून भारतात परतले. निवृत्तीपर्यंत बँकेची सेवा केली.
सेवाकाळात घरापासून दूर राहावे लागल्यानंतर दामोदर उपाध्ये निवृत्तीनंतर गोव्यात घरी परतले. परंतु, कामात स्वत:ला गुंतवून घेण्याच्या स्वभावामुळे बागायतदार खरेदी विक्री संस्थेचा कारभार हाती घेऊन कामाचे आधुनिकीकरण केले. समाजासाठी कार्य करण्याच्या इच्छेतून ढवळी येथील कुलदेवाच्या मंदिराचे काम पूर्णतेस नेले. द्रवीड ब्राह्मण संघाच्या कार्याला दिशा दिली. हे कार्य चालू असताना आरोग्याच्या समस्या उद्भवल्या, आजारपण अाले म्हणून निरुपायाने घरात बसावे लागले. तरी जुन्या आठवणींत रमून, मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या संगतीत आपण कसे आयुष्य जगतो आहे याचे वर्णन या आत्मचरित्रात आले आहे.
कुटुंबियांबद्दल वाटणारी आत्मीयता त्यांच्या लिखाणातून जागोजागी व्यक्त होते. या आपुलकीपोटीच निवृत्तीनंतर ते घरी परतले. लहानपणी वेगवेगळ्या ठिकाणी झालेली स्थलांतरे, शिक्षणासाठी वणवण, घर सोडल्यानंतरची तगमग, बँकेतील कारकिर्द, पुढील वाटचाल असे महत्त्वाचे टप्पे आेघवत्या भाषेत लिहिले आहेत. या वाटचालीत भेटलेली माणसे, मित्र यांना उपाध्ये यांच्या आयुष्यात खूप महत्व आहे. इंग्लंडमधील नऊ वर्षांचे अनुभव वाचनीय आहेत. या पुस्तकात अधेमधे रंगीत छायाचित्रेही आहेत. यामुळे या पुस्तकातून शब्दांच्या कथनाबरोबरच चित्रमय प्रवासही घडतो.
घरी प्रेमळ, तेवढेच कार्यालयात कर्तव्यदक्ष अशा या व्यक्तिमत्त्वाची जीवनकहाणी नवीन पिढीसाठी खूप प्रेरणादायी ठरू शकते. हुशारी, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर व्यक्ती कुठपर्यंत झेप घेऊ शकते याचा मूर्तिमंत दाखला या आत्मचरित्रातून मिळतो.
.................
गेले ते दिन गेले
लेखक : दामोदर उपाध्ये
प्रकाशक : सुलोचना दा. उपाध्ये, ढवळी- फोंडा
पाने : १४५, किंमत : १५० रुपये