आता गरज पर्यावरणीय संस्कारांची

राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेवा, स्काऊट आणि गाईडमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी प्रामाणिकपणे पर्यावरणीय संस्कार केले, त्यांना पर्जन्यजल संवर्धन, पाणलोटक्षेत्र विकास, नदीनाल्यांना सांडपाणी, कचरा मुक्त सारख्या चळवळीत सहभागी करून घेतले तर सध्या जी स्थिती भयावह झालेली आहे, त्यात निश्चित फरक पडू शकतो.

Story: लढवय्या । राजेंद्र केरकर | 01st November 2019, 06:00 Hrs

भारतीय राज्यघटनेनं देशाच्या प्रत्येक नारिकाचे पर्यावरण परिसंस्था आणि आणि वनपजीवसंवर्धन आणि संरक्षणात महत्त्वाची भूमिका असल्याचे मान्य करून त्यांनी कर्तव्य भावनेनं जर यासंदर्भात कार्य केले तर आज आपल्या समोर पर्यावरणाची जी बिघडती परिस्थिती नित्याची झालेली आहे. त्यात बदल घडला असता. आज आम्ही अशा प्रकारची सातत्याने कृत्ये करत आहोत की त्यामुळे पर्यावरणाचा असमतोल वाढत चालला आहे. एकेकाळी भारतात प्रचलित असलेल्या गुरूकूल शिक्षण प्रणालीने विद्यार्थ्यांना आवश्यक ज्ञान, कला, काैशल्य याविषयीचे शिक्षण देत असताना, त्यांच्यावर निसर्ग आणि पर्यावरणाचे संस्कार व्हावे यासाठी कोणताच निश्चित अभ्यासक्रम आखला नव्हता, तर वेगवेगळ्या विद्या, काैशल्याविषयीची जाणीव विकसित करताना त्यांना प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून निसर्गाच्या सान्निध्यात शिकवले होते. सांदिपनीच्या आश्रमात बालकृष्ण आपल्या डोक्यावर जळणाऱ्या लाकडांची मोळी घेऊन यायचा. धनूर्विद्येचे ज्ञान घेत असताना, त्या काळातल्या विद्यार्थ्यांचे आपल्या परिसराशी, मातीशी असलेले ऋणानुबंंध वृद्धिंगत व्हायचे. वृक्षवेली, पशुपक्षी, कृमीकिटकाविषयीची त्यांच्यात असलेली जाणीव वेगवेगळ्या अनुभवांद्वारे समृद्ध व्हायची.
भारतीय समाजाला लहानपणापासून पर्यावरणीय संस्कारांची परंपरा लाभलेली असली आणि आपल्या राज्यघटनेनं निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाला प्राधान्य दिले असले तरी आज पर्यावरणाचे रक्षण करण्याची भावना दुर्बल होत चालली आहे. त्यामुळे केरकचरा, सांडपाणी, नाना तऱ्हेचे प्रदुषण आदी समस्या आपले जीवन संत्रस्त करण्यात सिद्ध झालेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात निष्णात वकील अॅड. एम. सी.मेहता यांनी भारतीय विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देण्यात यावे म्हणून याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेऊन पर्यावरणीय शिक्षणाला काही प्रमाणात आपल्या देशात चालना लाभलेली आहे. परंतु राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेवा, स्काऊट आणि गाईडमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी प्रामाणिकपणे पर्यावरणीय संस्कार केले, त्यांना पर्जन्यजल संवर्धन, पाणलोटक्षेत्र विकास, नदीनाल्यांना सांडपाणी, कचरा मुक्त सारख्या चळवळीत सहभागी करून घेतले तर सध्या जी स्थिती भयावह झालेली आहे, त्यात निश्चित फरक पडू शकतो. स्वीडन देशातल्या सोळा वर्षांच्या विद्यार्थ्यांनी ग्रेटा थुनबर्गनं पर्यावरण जागृतीच्या चळवळीत आपणाला झाकून देत, निसर्गाचा ऱ्हास करून पृथ्वीचे तापमान बृद्धिंगत करणे, हवा प्रदुषणाचे संकट निर्माण करणे याविरूद्ध आपला आवाज उठवत असताना, प्रदूषणाची समस्या थांबवली पाहिजे. नव्या पिढीला हवा, जेल, ध्वनी प्रदूषणाच्या समस्यांत ढकलून त्यांचे जगणे संकटग्रस्त करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात तिने आपला आवाज बुलंद केलेला असून, ग्रेटा थुनबर्गला सध्या तिच्या चळवळीसाठी पाठबळ लाभत चालले आहे.
जगभर आज कर्ब वायुच्या उत्सर्जनात झालेल्या वाढीमुळे तापमान वाढीबरोबर हवामानात विलक्षण बदल घडत आहे ही चिंतेची बाब असल्याकारणाने गेल्या तीन दशकांपासून मी विद्यार्थी त्याचप्रमाणे तरूण पिढीवर पर्यावरणीय संस्कार व्हावे या हेतूने निसर्ग संस्कार पदभ्रमण, गिर्यारोहणासारख्या उपक्रमांचे यशस्वीरीत्या करण्याला प्राधान्य दिले होते. १९९८ साली आम्ही विवेकानंद स्मृती संघ, केरी-सत्तरी आणि नेहरू युवा केंद्र उत्तर गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांत सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या १०२७ मिटर उंची असलेल्या सोसोगडावर गिर्यारोहणाचे आयोजन केले होते. वाघेरी, मोर्लेगड, सिद्धनाथ, रावण डोंगरसारख्या पर्वत शिखरांवर आम्ही गिर्यारोहणाचे उपक्रम यशस्वी केले होते. सोसोगडावर सतत आठ तास नागमोडी वळणाऱ्या वाटांचा आधार घेत आम्ही संध्याकाळपर्यंत पोहचलो होतो. पट्टेरी वाघ, अस्वल, बिबट्यासारख्या जंगली श्वापदांची सोसोगडावर वस्ती होती आणि त्यामुळे रात्री आळीपाळीने जागरण करत आणि आग पेटती ठेऊन सोसोगडावरची रात्र निर्विघ्न संस्मरणीय करण्यात आली होती. सोसोगडावर १९५५च्या आसपास मँगनिज खनिजाचे उत्खनन करणाऱ्या खाणी चालू होत्या. त्या खाणींमुळे सोसोगडाचे अस्तित्व उद्धवस्त होणार होते. परंतु १९९९ साली सोसोगडाचा समावेश म्हादई अभयारण्यात झाल्याकारणाने आज इथल्या जंगलांच्या विध्वंसाला कारणीभूत ठरणाऱ्या मँगनिजच्या खाणी बंद झालेल्या आहेत. १९९८ साली गिर्यारोहकांना मी मँँगनिजच्या खाणींचे दर्शन घडवले. डोंगर माध्यावर इतक्या दुर्गम ठिकाणी एकेकाळी ज्या मँगनिजच्या खाणी कार्यान्वित होत्या ते पाहून गिर्यारोहक अचंबित झाले होते. बारामाही उपलब्ध असलेली पाण्याची झर, मुबलक प्रमाणात इथे असलेली कंदमुळे यामुळे कधीकाळी इथे आदिमानवाचा संचार आणि वास्तव्य असले पाहिजे. आदिमानवाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा त्याचप्रमाणे नैसर्गिक गुंफा, छोट्या लोखंडी गोळ्यासारखे डोंगर माध्यावर आढळणारे दगड, गोवा आणि कर्नाटक ह्या दोन्ही राज्यांची सीमा दर्शवणारे दगड आणि तेथील वृक्षवेली, पशुपक्षी आदी जैविक संपदेच्या वैविध्यपूर्ण घटकांची माहिती या मोहिमेत सहभागी झालेल्यांना देण्यात आली होती.
शंभरच्या आसपास तरूण, वयोवृद्ध मंडळी सोसोगड मोहिमेत सहभागी झाली होती. वनस्पतीशास्त्र, प्राणि शास्त्र, भूगर्भशास्त्र, भाषाशास्त्र, चित्रकला, नाट्यकला इतिहास आदी ज्ञानशाखांचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्यांच्या सहभागामुळे या मोहिमेत ज्ञानाचे आदान प्रदान व्यवस्थितपणे झाले. गोव्यात पशुपक्षी यांच्या अभ्यासासाठी व्रतस्थपणे कार्य करणारे अभ्यासक, संशोधक यांच्यासाठी ही मोहीम दिशादर्शक ठरली होती. स्वामी विवेकानंद स्मृती संघ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांद्वारे संशोधक नजर असलेल्या तरूणाईवर केवळ पर्यावरणीय संस्कार नव्हे तर ज्ञानतृष्णेत वृद्धी झाली आणि त्यांच्या मनात असलेल्या इच्छा-आकाक्षांना समर्थ व्यासपीठ लाभले.
आजही मी आशावादी असल्याकारणाने अशा तऱ्हेच्या उपक्रमांच्या आयोजनाला सतत प्राधान्य देत असतो, त्याला नव्या पिढीत पर्यावरण संस्कार व्हावे. आज आपल्या बदलत्या जीवन शैलीमुळे आम्ही नैसर्गिक साधन संपत्ती कशा रितीने आेरबाडून वापरत आहोत. उर्जेचा गैरवापर करून प्रदूषणाबरोबर मानवी समाजाबरोबर अन्य सजीवांचे जगणे कसे संकटग्रस्त करत आहोत याची प्रचिती मी सभोवताली घेत असल्याने पर्यावरणाविषयक कार्यशाळा, निसर्ग संस्कार शिबिरे, गिर्यारोहण, प्रदभ्रमण यासारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरण शिक्षणाची चळवळ चालू ठेवलेली आहे. कायापालट घडवण्यासाठी आपण नियोजनबद्ध आणि अविरतपणे प्रयत्नांची पराकाष्टा आरंभली तर त्यात उशिरा का होईना, आपण ज्या ध्येय प्राप्तीखातर वावरतो, त्याची पूर्तता करण्यात आपणाला यश मिळते याची मला खात्री आहे.       

Related news

पुन्हा पुतळ्याचे राजकारण

सिक्वेरांच्या पुतळ्याचा विषय तापवत ठेवण्यावर त्यांचा भर असेल. कारण यातूनच फातोर्डा मतदारसंघातील दुरावलेले ख्रिस्ती मतदार पुन्हा जवळ येऊ शकतील असे त्यांना वाटते. Read more

मूल्य शिक्षणात ‘राष्ट्रभक्ती’ संस्काराचे महत्त्व !

युद्धाव्यतिरिक्त इतर जागतिक आर्थिक, आैद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आक्रमणाविरूद्धही आपल्याला लढाई जिंकता येईल. या सर्व बाजू पाहता राष्ट्रभक्ती ह्या संस्कारमूल्याची महती आपल्याला कळून येईल. Read more

Top News

कार्यकारी संपादकपदी नेमणूक

किशोर नाईक गांवकर - गोवन वार्ता; पांडुरंग गांवकर - भांगरभूंय Read more

मडगाव अर्बनचे ‘टीजेएसबी’त विलिनीकरण अखेर निश्चित

म्हापसा अर्बनची मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक; सारस्वत बँकेकडून प्रक्रियेला गती Read more

अधिकारी तुपाशी; चालक-वाहक उपाशी

बदली चालक-वाहकांना प्रतिदिन फक्त ५०० रुपये; सुविधांपासूनही वंचित Read more

परप्रांतीय आडनावे असलेले कर्मचारी गोमंतकीयच

‘कदंब’चे महाव्यवस्थापक संजय घाटे यांचे स्पष्टीकरण Read more