आयएसएल : संभाव्य विजेत्यांच्या पलिकडे चुरशीच्या लढतींची अपेक्षा

20th October 2019, 09:06 Hrs

पणजी :इंडियन सुपर लीगला (आयएसएल) रविवार दि. २० ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. बंगळुरू एफसी आणि एफसी गोवा असे संघ नेहमीप्रमाणेच संभाव्य विजेते असतील, पण या स्पर्धेत अनपेक्षित निकालांच्या अपेक्षेने फुटबॉलप्रेमींना सज्ज राहावे लागेल.
गतविजेता बंगळुरू आणि गतउपविजेता गोवा या दोन संघांनी गेल्या सत्रात वैशिष्ट्यपूर्ण शैलीच्या जोरावर लक्षवेधी कामगिरी केली. दोन्ही क्लबना संघाचा मूळ गाभा कायम ठेवण्यात यश आले आहे. त्यामुळे त्रयस्थ चाहत्यांच्या दृष्टीने ते अखेरपर्यंत मजल मारू शकतील.
बंगळुरू आणि गोवा हे भक्कम दावेदार आहेत यात शंका नाही, पण सर्वच संघांनी मोसमपूर्व घडामोडींमध्ये धूर्त चाली रचल्या आहेत. त्यामुळे २०१९-२०च्या आयएसएलसाठी व्यासपीठ सज्ज झाले आहे. अन्य कोणत्याही संघाने एटीकेइतके लक्ष वेधून घेतलेले नाही. माजी विजेत्यांनी अनेक दर्जेदार परदेशी खेळाडू करारबद्ध केले आहेत. कागदावर सर्वाधिक बलाढ्य संघ हाच वाटतो.
गेल्या सत्रात चेन्नईयीन एफसी तळात राहिला. त्यांनी नव्या चेहऱ्यांचा संघ तयार केला आहे. मोसमपूर्व मित्रत्वाच्या लढतींमध्ये हा संघ अत्यंत चुरशीने खेळला.
आधी संभाव्य विजेत्यांचा आढावा घेऊयात. यात बंगळुरू एफसी आघाडीवर असायला हवा. सुधारणा करण्यास वाव असलेली क्षेत्र त्यांनी हेरली. आशिक कुरुनीयन आणि रॅफेल आगुस्टो अशा दोन महत्त्वाच्या खेळाडूंना करारबद्ध करीत त्यांनी संघ भक्कम केला आहे. आधीच्या मोसमांमध्ये या दोन्ही खेळाडूंनी आपल्या क्लबसाठी चमकदार कामगिरी केली आहे.
एफसी गोवाने एकही नवा परदेशी खेळाडू घेतलेला नाही. गेल्या मोसमातील सर्व सहा परदेशी खेळाडू त्यांनी कायम ठेवले. यात बचावपटू मुर्तडा फॉल, दमदार मध्यरक्षक अहमद जाहौह आणि गोल्डन बूट विजेता फेरॅन कोरोमिनास यांचा समावेश आहे. त्यांच्या जोडीला ब्रँडन फर्नांडिस, मंदार राव देसाई आणि मानवीर सिंग असे प्रतिभाशाली भारतीय खेळाडू आहेत. हे मिश्रण पाहिले तर गोवा गेल्या मोसमातील उपविजेतेपदाच्या तुलनेत एक पाऊल पुढे टाकू शकतो.
गेल्या मोसमात १० संघांनी मिळून २५४ गोल केले. आगामी मोसमात गोलांची आणखी रंगतदार मेजवानी मिळण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक संघाने गोल नोंदविण्याचा लौकीक असलेले खेळाडू भरती केले आहेत. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने घानाचा आंतरराष्ट्रीय स्टार तसेच संडरलँडचा माजी स्ट्रायकर आसामोह ग्यान याला करारबद्ध केल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटते आहे. गोल करण्याची त्याची क्षमता सिद्ध झालेली आहे.
केरळा ब्लास्टर्स एफसी मागील दोन मोसमांमधील निराशा झटकून पुनरागमनास सज्ज झाला आहे. गोल करण्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यावर त्यांची मदार असेल. गेल्या मोसमात ओगबेचे याच्यापेक्षा जास्त गोल केवळ कोरोमिनास यालाच करता आले होते. मुंबई सिटी एफसीकडे सुद्धा मोडोऊ सौगौ याच्या रुपाने गोल करणारा मोहरा आहे. गेल्या मोसमातील फॉर्म तो कायम राखण्याची अपेक्षा आहे.
हैदराबाद एफसी आणि ओडिशा एफसी या नव्या संघांनी कमी कालावधीत चुरशीने खेळणारा संघ तयार केला आहे. हैदराबादकडे मार्सेलिनीयो, मार्को स्टॅन्कोविच असे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना या लीगची चांगली माहिती आहे. ओडिशाकडे प्रतिभाशाली भारतीय खेळाडू आहेत. त्यांच्या जोडीला मार्कोस टेबार, झिस्को हर्नांडेझ असे खेळाडू आहेत, जे कल्पक आक्रमण रचू शकतात.
२०१९-२०च्या आयएसएल मोसमात अनेक धुर्त प्रशिक्षक सुद्धा मैदानाच्या बाजूला सज्ज असतील. यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीच्या रॉबर्ट जार्नी यांचा समावेश आहे. जार्नी यांनी एल्को शात्तोरी यांची जागा घेतली आहे. शात्तोरी यांनी ब्लास्टर्सची सूत्रे स्वीकारली आहेत. एटीकेने अँटोनिओ हबास यांचा पुन्हा स्वागत केले आहे. पहिली लीग त्यांच्या मार्गदर्शनाखाली एटीकेने जिंकली होती. जमशेदपूर एफसीने स्पेनचे प्रशिक्षक अँटोनीओ इरीओंदो यांच्याशी करार केला आहे. स्पेनमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त काळ मार्गदर्शन करण्याचा अनुभव त्यांच्या खात्यात जमा आहे.
नव्या मोसमात जुने कट्टर प्रतिस्पर्धी चुरशीने खेळतील. याशिवाय अनेक संघांमधील प्रमुख खेळाडूंनी क्लब बदलल्यामुळे चुरशीने खेळणारे नवे प्रतिस्पर्धी सुद्धा निर्माण होतील. जमशेदपूरची सर्जिओ सिदोंचा-मारीओ आर्क्वेस ही जोडी ब्लास्टर्सच्या जर्सीत दिसेल. ब्राझिलचा रॅफेल आगुस्टो चेन्नईयीन एफसीकडून बंगळुरू एफसीकडे वळला आहे. केरळवासीयांचा लाडका अनास एडाथोडीका प्रतिस्पर्धी एटीकेचे प्रतिनिधीत्व करेल.
या मोसमात अनेक गोष्टींची उत्कंठा असेल. संभाव्य विजेते असतीलच, पण हा मोसम जास्त अनपेक्षित ठरेल अशीच दाट शक्यता आहे.
आयएसएलमधील प्रमुख वैशिष्ट्ये
एकूण सामने : ३७३
एकूण गोल : ९५६
सर्वाधिक गोल : १५४ एफसी गोवा
-आतापर्यंत आयएसएलमध्ये ६७ देशांचे ५८८ खेळाडू खेळले आहेत.
-गेल्या पाच वर्षांतील प्रेक्षकांची संख्या : ७ लाख ५६ हजार ८२५  

Related news

आयएसएलची रणधुमाळी आजपासून

एटीकेविरुद्ध विजयी सलामीस ब्लास्टर्स उत्सुक Read more

सौरभ वर्माला अजिंक्यपद

व्हिएतनाम ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १०० Read more

Top News

कार्यकारी संपादकपदी नेमणूक

किशोर नाईक गांवकर - गोवन वार्ता; पांडुरंग गांवकर - भांगरभूंय Read more

मडगाव अर्बनचे ‘टीजेएसबी’त विलिनीकरण अखेर निश्चित

म्हापसा अर्बनची मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक; सारस्वत बँकेकडून प्रक्रियेला गती Read more

अधिकारी तुपाशी; चालक-वाहक उपाशी

बदली चालक-वाहकांना प्रतिदिन फक्त ५०० रुपये; सुविधांपासूनही वंचित Read more

परप्रांतीय आडनावे असलेले कर्मचारी गोमंतकीयच

‘कदंब’चे महाव्यवस्थापक संजय घाटे यांचे स्पष्टीकरण Read more