आयएसएलची रणधुमाळी आजपासून

एटीकेविरुद्ध विजयी सलामीस ब्लास्टर्स उत्सुक

20th October 2019, 09:05 Hrs

कोची :इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमाची सलामी रविवारी केरळा ब्लास्टर्स आणि एटीके यांच्यात होत आहे. दोन वेळचा माजी उपविजेता ब्लास्टर्स दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेविरुद्ध विजयी सलामी देण्यास उत्सुक असेल. येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत रंगेल.
ब्लास्टर्सच्या मार्गदर्शकपदाची सूत्रे एल्को शात्तोरी यांनी स्वीकारली आहेत. यजमान संघाला प्रोत्साहन देण्यासाठी चाहत्यांची भरपूर गर्दी अपेक्षित असेल. त्यामुळे आपल्यासमोर खडतर आव्हान असल्याची जाणीव शात्तोरी यांना आहे.
नेदरलँड्सच्या शात्तोरी यांनी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीच्या साथीत मागील मोसम यशस्वी ठरवला. आता कोची स्थित ब्लास्टर्ससाठी ते अशीच जादुई कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. यंदा कागदावर तुलना केल्यास सर्वाधिक बलाढ्य संघ एटीकेचा वाटतो. अशा संघाविरुद्ध विजयाने सुरुवात करण्याशिवाय आणखी चांगली सलामी ब्लास्टर्ससाठी असू शकत नाही.
शात्तोरी यांनी सांगितले की, सलामीचे सामने नेहमीच खडतर असतात. चाहत्यांच्या अमाप अपेक्षा असतात, जो खेळाचाच एक भाग असतो. संघ स्थिरावणे महत्त्वाचे असेल. आम्ही एटीकेला सामोरे जाण्यास सज्ज आहोत असे वाटते. त्यांचा संघ फार भक्कम आहे आणि आमचा संघ लीगमधील सर्वोत्तम संघांमध्ये आहे.
ब्लास्टर्सने यापूर्वी २०१६ मध्ये प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविले होते. त्यानंतर अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी त्यांनी व्यवस्थापनाच्या पातळीवर बरेच बदल केले आहेत. शात्तोरी यांना या परिस्थितीची जाणीव आहे. क्लबमध्ये स्थैर्य निर्माण करण्यात यश येईल अशी त्यांना आशा आहे.
त्यांनी सांगितले की, एटीके, नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि ब्लास्टर्स यांच्याकडे सर्वाधिक प्रशिक्षक झाले आहेत. त्यामुळे अखेरीस स्थिरावणे महत्त्वाचे असते. येथे माझे व्यवस्थापनाबरोबरील संबंध चांगले आहेत. गेल्या वर्षी मला मिळालेल्या संघाच्या सखोलपणाच्या तुलनेत आताचा संघ सरस वाटतो. अर्थात हे काही टोमॅटो सुपसारखे नसते. नॉर्थईस्टमध्ये मोसम यशस्वी ठरण्यात निर्णायक ठरलेल्या सर्व गोष्टींची कॉपी मी करू शकत नाही. संपूर्ण संघ जवळपास नवा आहे, पण मी आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहे.
ब्लास्टर्सने परदेशी खेळाडूंचा ताफा नव्याने घडवला आहे. त्यांनी काही मान्यताप्राप्त खेळाडूंना आणले आहे. यात बार्थोलोम्यू ओगबेचे, जियान्नी झुईवर्लून, मारीओ आर्क्वेस यांचा समावेश आहे. रॅफेल मेस्सी बौली याच्यासारखे काही उदयोन्मुख खेळाडू सुद्धा आले आहेत.
त्यांच्याकडे साहल अब्दुल समद याच्यासारखे काही तरुण भारतीय खेळाडू सुद्धा आहेत, पण संदेश झिंगन याची गैरहजेरी मोठा धक्का असेल. राजू गायकवाड याच्या रुपाने त्यांनी बदली खेळाडू आणला आहे. पूर्वतयारी मात्र मनासारखी झाली नसल्याचे शात्तोरी यांनी मान्य केले.
त्यांनी सांगितले की, आमच्याकडे उत्तम संघ आहे. आम्ही काही चांगले परदेशी खेळाडू आणले. मोमसपूर्व तयारी मात्र मला हवी तशी होऊ शकली नाही. पूर्वतयारी परिपूर्ण होऊ शकली नाही. काही परदेशी खेळाडूंचे आगमन झाले तेव्हा त्यांना आधीच दुखापती झाल्या होत्या. आम्ही दोन-तीन आठवड्यांनी पिछाडीवर असून आम्हाला ती भरून काढावी लागेल.
पूर्वी आपण मार्गदर्शक असलेल्या संघात राजू होता. आम्हाला आणखी एका अनुभवी सेंटरबॅकची गरज होती. त्याची तंदुरुस्ती अपेक्षेनुसार नाही. त्याची मोसमपूर्व तयारी चांगली झाली नाही, पण संघातील वातावरण चांगले आहे, असेही शात्तोरी यांनी सांगितले. 

Top News

कर्नाटकचे मंजुरीपत्र; नियोजित डावाचा संशय

म्हादई : वन, वन्यजीव परवान्यासाठी कर्नाटकची सल्लागार नियुक्ती निविदा Read more