चिरे खाणींच्या खंदकांवर सुरक्षात्मक उपाय करा

खाण खात्याचा आदेश; २० ऑक्टोबरपर्यंत मुदत

17th October 2019, 06:01 Hrs

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : तुये (पेडणे) येथे चिरेखाणीच्या खंदकात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर खाण खात्याने अशा खंदकांवर सुरक्षात्मक उपाय करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांना चिरे किंवा अन्य लघु खनिज काढण्यासाठी परवाने दिले होते, त्या लीजधारकांनी २० ऑक्टोबरपर्यंत अशा खंदकांबाबत सुरक्षात्मक उपाय करावेत, असे या आदेशात म्हटले आहे.

खाण खात्याचे उपसंचालक गुरुदास देसाई यांनी खंदकांच्या सुरक्षात्मक उपायांचा आदेश जारी केले आहेत. खात्याने ज्यांना लघु खनिज उत्खननासाठी लीज दिलेली आहे, त्यांनी उत्खननानंतर निर्माण झालेल्या खंदकात पाणी साचत असल्यामुळे सुरक्षेचे उपाय करावेत, असे म्हटले आहे. खंदकातील पाण्यामुळे नागरिकांना तसेच प्राण्यांच्याही जिवाला धोका निर्माण होतो आणि दुर्घटना घडतात. पेडणे तालुक्यातील तुये येथील अशाच एका खाणीच्या खंदकात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. लीजधारकांनी अशा खंदकांवर सुरक्षात्मक उपाय करावेत आणि दहा दिवसांत त्याविषयी केलेल्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करावा, असे देसाई यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

तुयेतील दुर्घटनेचा संदर्भ देत निर्देश जारी

पेडणे, बार्देश, डिचोली, सत्तरी, सांगे, फोंडा, धारबांदोडा, केपे या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिरेखाणी तसेच खडी काढून निर्माण झालेले खंदक आहेत. लघु खनिज काढून कमाई झाल्यानंतर लीजधारक खाणींचे खंदक तसेच खुले सोडून देतात. या खंदकांमध्ये नागरिक अथवा प्राणी बुडून मृत्यू पावण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. खाण खात्याने काही वर्षांपूर्वी अशा खंदकांवर सुरक्षात्मक उपाय करण्याबाबत निर्देश दिले होते, पण त्याकडे लीजधारकांनी दुर्लक्ष केले. आता पुन्हा खाण खात्याने तुयेतील दुर्घटनेचा संदर्भ देत अशा खंदकांवर सुरक्षात्मक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत.

खाण खात्याला एनजीटीकडून ५ लाखांचा दंड

पेडणे तालुक्यातील चिरे खाणींच्या धोकादायक खंदकांबाबत सुरक्षेच्या उपाययोजना आखण्यात अपयश आल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाकडून खाण खात्याला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सहा महिन्यांच्या आत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश लवादाकडून देण्यात आले होते. खाण खात्याने सादर केलेल्या अहवालावर लवादाने नाखुशी व्यक्त केली. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि खाण संचालक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. तुये येथील चिरे खाणीत डॉन बॉस्को विद्यालयाचे चार विद्यार्थी बुडून मरण पावण्याची घटना घडल्यानंतर या प्रकाराला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

Top News

कार्यकारी संपादकपदी नेमणूक

किशोर नाईक गांवकर - गोवन वार्ता; पांडुरंग गांवकर - भांगरभूंय Read more

मडगाव अर्बनचे ‘टीजेएसबी’त विलिनीकरण अखेर निश्चित

म्हापसा अर्बनची मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक; सारस्वत बँकेकडून प्रक्रियेला गती Read more

अधिकारी तुपाशी; चालक-वाहक उपाशी

बदली चालक-वाहकांना प्रतिदिन फक्त ५०० रुपये; सुविधांपासूनही वंचित Read more

परप्रांतीय आडनावे असलेले कर्मचारी गोमंतकीयच

‘कदंब’चे महाव्यवस्थापक संजय घाटे यांचे स्पष्टीकरण Read more