रंगोली सजाओ

टीपकागद

Story: प्रतिभा कारंजकर |
12th October 2019, 11:27 am


-
श्रावणापासून सणावारांचे दिवस सुरू होतात. गणपती, नवरात्री, दसरा व नंतर आनंदाची पर्वणी घेऊन येणारा सण म्हणजे दिवाळी. अशा मंगलमय वातावरणात काही गोष्टी आवर्जून केल्या जातात. त्यातलीच एक म्हणजे रांगोळी. प्रत्येक सणावारी दारी, अंगणी रांगोळी काढून शोभायमान केलं जातं. ही कला म्हणजे भारतीय संस्कृतीचे द्योतक. संस्कृतमध्ये याला रंगवल्ली म्हटलं जातं. विविध रूपात ती दिसते. ठिपके जोडून तयार होणारी, भौमितिक रचना असलेली, मुक्त हस्तकला असलेली चित्रावली. सौंदर्याचा, सजावटीचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी देणारी अशी ही रांगोळी संस्कृती व संस्काराचा एक भाग आहे.
दारापुढील सुबक रांगोळीशिवाय दिवाळीचा सण पूर्णच होत नाही. यात नुसतीच सजावट नसते तर मांगल्यपूर्ण अशी शुभचिन्हेही रेखाटली जातात. ती पाहून घरीदारी लक्ष्मी, सुबत्ता, शुभ, संपत्ती, सुख येईल. स्त्रिया लक्ष्मीची पावले काढतात, ज्यायोगे तिला त्या आमंत्रित करत असतात. गोपद्म म्हणजे गाईची पावले काढतात. गाय म्हणजे दुधदुभत्यांची रेलचेल म्हणजेच समृद्धी आणि ते देणारी गाय. तिच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करायचा हा मार्ग. कमल पुष्प काढले जाते हे पवित्र पुष्प मानले जाते. स्वस्तिकही रेखाटण्याची प्रथा आहे. कारण हे देवांना आसन म्हणून प्रिय असते. काही ठिकाणी सूर्य, चंद्र, तारे, शंख यांचेही चित्र रेखाटतात. या सर्व शुभचिन्हांनी अंगण सजवले की खर्‍या अर्थाने घरी येणार्‍या पाहुण्याचे स्वागत झाल्यासारखे वाटते. तोही प्रसन्न होतो.
लहानपणी दिवाळीला आमच्या वाड्यातल्या प्रत्येक खोल्यांपुढील अंगणात रांगोळी काढली जायची. इरिशिरीने स्त्रिया रांगोळी रेखाटायच्या. पण सुळे वहिनींच्या रांगोळीची बातच काही औरच असायची. कुठलाही रंग न वापरता सारवलेल्या जमिनीवर फक्त पांढर्‍या रेषांनी मुक्तहस्त चित्र त्या रेखाटायच्या, त्याला तोड नव्हती. फुलापानांची बारीक रांगोळी रेखाटताना त्या अगदी तल्लीन होऊन जायच्या आणि मी मात्र आपल्याला कधी अशी काढायला जमेल का? असा प्रश्न विचारत रहायचे. त्या नोकरी करत असल्याने फक्त दिवाळीतच त्यांना रांगोळी काढायला सवड मिळे आणि आम्हाला पहायला.
नुकताच बंगलोरला जायचा योग आला. तिथल्या मल्लेश्वरम भागातल्या वास्तव्यात मला प्रत्येक घरापुढे रांगोळी दिसली. बहुतेक पिठाची पेस्ट करून काढली असावी. कारण दिवसभर ती पुसली जात नसे. त्याचे आकार हे ठिपक्यांना जोडलेले नसून ठिपका मध्ये ठेवून त्या भोवती काढलेली असायची, खास वळणावळणाची शैली असलेली रांगोळी ही तिथली खासियत. रोज सकाळी नव्याने रेखाटली जात होती. त्यावर पाय देऊन अनेक जण जात, पण ती विस्कटत नसे.
पूर्वी जेवणाच्या ताटाच्या कडेने रांगोळी घातली जाई. पंगत असल्यास रांगोळी भरलेल्या धातूच्या आडव्या रोलरमधून पट्टे ओढले जात. कुठे पाण्यावर कोळशाची भुकटी पसरवून बेस तयार करून त्यावर रांगोळी घातली जाते. दक्षिणेकडे फुलांच्या रंगोलीला जास्त महत्व. त्यांच्याकडे ओणम, पोंगल या सणांना फुलांची रांगोळी काढली जाते. कोलकात्यात मी ऑइलपेंट वापरुन परमनंट रांगोळी घातलेली पाहिली. एकदा काढली की वर्षभर काहीच होत नसेल त्याला. त्यात फुले पाने, चित्रे प्राणीही असतात व खास करून मासा हा असतोच. मासा ही तिथल्या संस्कृतीची समृद्धीची खूण आहे. ती रांगोळीतले एक प्रतीक बनलेय, त्यांच्याकडे रांगोळीला अलिपना किंवा अल्पना म्हणतात.
आपल्याकडे पूर्वीपासून स्त्रियांनी पहाटे उठून सडासंमार्जन करून रांगोळी काढायची पद्धत होती. अजूनही दिसते, पण शहरात मात्र तिने अंग आकसून घेतलेले दिसते. तरी उंबरा किंवा छोटासा कोनाडा रांगोळीने सजवलेला दिसतो. कधी एखादी स्त्री त्यावर हळदकुंकू वहाते, कुठे ‘श्रीराम, जय राम’ लिहिते म्हणजे येणारा जाणारा त्यावर नजर पडली की ते वाचतोच. नकळत देवाचे नामस्मरण घडते.
आता संस्कार भारतीच्या रांगोळीमुळे या कलेचा प्रसार झपाट्याने झालाय. रंगबिरंगी मोठमोठ्या आकारात आणि झटपट तयार होणार्‍या आकर्षक अशा कलाकृती बघायला मिळतात. त्यात बरेचसे बदल, रंगांची विविधता आहे. रंगसंगती कळणं महत्त्वाचं, ते जमलं की रांगोळीत उठावदारपणा येतो. पूर्वी ही कला म्हणजे स्त्रियांची मक्तेदारी होती, पण आता तरुण मुले, पुरुषसुद्धा यात पारंगत दिसतात. या कलेला ते पोर्ट्रेट स्वरुपात पेश करताना दिसतात. स्पर्धाही होऊ लागल्या आहेत. गौरी गणपतीत एका गृहिणीने देवापुढे रांगोळीने गालीचा रेखाटला होता,तो गालीचा नसून रांगोळी आहे हे सांगितले तरी खरं वाटत नव्हते. इतका सुंदर दिसत होता. स्त्रियांच्या कल्पना शक्तीला,कलेला वाव मिळवून देणारी ही कला दिवसेंदिवस अशीच प्रगत होत जाईल, यात शंकाच नाही.
(लेखिका गृहिणी, साहित्यिक आहेत.)