महिलेच्या संघर्षाची कथा

रुपेरी पडदा

Story: विद्या नाईक होर्णेकर |
12th October 2019, 11:25 am
महिलेच्या संघर्षाची कथा


-
नोव्हेंबर सुरु झाला की जगभरातील सिनेरसिकांसोबतच गोमंतकीयांनाही वेध लागतात, ते इफ्फीचे. हा चित्रपट महोत्सव म्हणजे ‘मेजवानी’ च असते. त्यात यंदाच्या इफ्फीला विशेष महत्त्व आहे. कारण इफ्फी यंदा पन्नाशी साजरी करत आहे. साहजिकच इफ्फीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदा सजावट कशी असेल, कुठले चित्रपट, कलाकार पहायला मिळतील, उद्घाटन कोण करील... असे अनेक प्रश्न इफ्फी ‘चाहत्यां’च्या मनात रुंजी घालत असतील. या सगळ्यांची उत्तरे हळूहळू मिळू लागली असून, यंदाच्या इफ्फीत ‘आनंदीगोपाळ’ या चित्रपटाचा समावेश आहे. प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून पहावा. गेल्या सप्टेंबरमध्ये तो झी वाहिनीनेही दाखवला होता.
या चित्रपटाला सुरेख हाताळण्यात आले आहे. केवळ ‘चित्रपट’ राहू न देता, १३० वर्षांपूर्वीचा काळच जणू निर्माता-दिग्दर्शकांनी उभा केला आहे. त्यामुळे प्रेक्षक तो काळ जगतात असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. ‘चूल अन् मूल’ या चक्रात स्वत:चे सुख शोधणाऱ्या स्त्रीला चौकटीबाहेरचे विश्व पाहण्याची स्वप्ने, ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पडू शकली, त्या ‘आनंदी-गोपाळ’ ची ही कथा. एका महिलेच्या संघर्षाची कथा, जिने संस्कृती व सभ्यता जपूनही, प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे धाडस केले. देशाची पहिली महिला डॉक्टर म्हणून नाव इतिहासात अजरामर केले. ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ असे सांगितले जाते, पण एका पुरूषाची यथायोग्य साथ लाभली तर एक स्त्रीही आकाशाला गवसणी घालू शकते, याची कथा म्हणजे ‘आनंदी गोपाळ’.
आज स्त्री शिक्षणाचे वावडे नाही. किंबहुना मुलींच्या शिक्षणासाठी पालक विशेष प्रयत्नशील असल्याचेही पहावयास मिळते. मात्र ज्या काळात स्त्रीचे शिक्षण म्हणजे महापाप अशी धारणा होती, त्याकाळात एका महिलेने सातासमुद्रापार जात मिळवलेले यश किती मौल्यवान असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे इफ्फीत जर हा चित्रपट पाहण्याची संधी मिळत असेल तर अधिकाधिक प्रेक्षकांनी खास करुन नव्या पिढीने हा चित्रपट नक्कीच पहावा. कारण आज सर्वसोयींनीयुक्त असे जीवन लाभूनही कित्येक युवक-युवती शिक्षणाबाबत म्हणाव्या तितक्या गंभीर असल्याचे दिसत नाही. भारताला ‘सुवर्णक्षण’ अनुभवण्यास दिलेल्या आनंदी आणि गोपाळ या जोशी दांपत्याने त्यासाठी दिलेले बलिदान आज क्वचितच कुणाला उमगेल. शून्यातून त्यांनी जे विश्व निर्माण केले, त्याची भव्यता कुठल्याही नजरेतून सुटू शकणार नाही. कारण ‘शिक्षण’ मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. किंबहुना त्यांच्या घुसमटीची कल्पना एकविसाव्या शतकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना येणेही केवळ अशक्य.
श्री. ज. जोशी यांच्या ‘आनंदी गोपाळ’ कादंबरीवर हा चित्रपट आहे. १९७० च्या दशकात प्रकाशित झालेली ही कादंबरी लोकप्रिय ठरली होती. तितकाच हा चित्रपटही लोकप्रिय ठरला आहे. पण, त्याला केवळ प्रादेशिक प्रेक्षकच प्राप्त झाला. विक्षिप्त स्वभावाचे तरी आधुनिक विचारसरणीचे गोपाळराव जोशी व वयाने लहान असल्यामुळे थोडीशी बालिश तरीही समंजस, हळवी, भाबडी, पतीला परमेश्वर मानून त्याच्या मतांचा आदर करणारी त्यांची बायको आनंदी जोशी, यांच्या अनोख्या संसारातील आंबट-गोड घटनांची सांगड म्हणजे हा चित्रपट. गोपाळरावांनी आनंदीला शिकवण्याचा अहोरात्र घेतलेला ध्यास प्रेक्षकांवर गारुड घातल्याशिवाय रहात नाही. कारण ‘आनंदी गोपाळ’ ही केवळ कादंबरीतील आभासी पात्रं नव्हती. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील खरीखुरी व्यक्तिमत्त्वे होती, ज्यांनी सनातनी प्रवृत्तीशी जोरदार लढा देत ध्येयपूर्ती केली. कारण त्या काळात बाईने घराबाहेर पडणं, शिकणं, एवढंच काय स्वत:च्या नवऱ्याबरोबर बाहेर फिरणंदेखील धर्म बुडवण्याइतकं जहाल मानले जात होते, पण या वायफळ परंपरांना कुरवाळत न बसता, धर्माच्या नावावर तत्कालीन समाजाने जी बंधने घालू पाहिली, त्याच्या नेमके उलट वागण्याचा अट्टाहास आणि योग्य तेच स्वीकारण्याची धमक बाळगून पत्नीला ध्रृवपदापर्यंत नेणाऱ्या एका अनोख्या पतीची ही कथा प्रेक्षकांनी पहावीच.
दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी त्या काळाला रुपेरी पडद्यावर केवळ जिवंतच केले नाही, तर त्याला तितकेच भव्यत्वही प्राप्त करुन दिले. ‘आनंदीबाई’ च्या लहानपणीच्या भूमिकेत अंकिता गोस्वामी व मोठेपणीच्या भूमिकेत भाग्यश्री मिलिंद आणि ललित प्रभाकर (गोपाळराव) यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे एकोणिसाव्या शतकाची वातावरणनिर्मिती करायची हे एक दिव्यच होतं व ते सर्वांनी अगदी उत्कृष्टरीत्या पार पाडले आहे. सेट उभारून काही गोष्टी करणे आणि चौकटीच्या बाहेर काही गोष्टी करणे, यात जमीन आसमानाचा फरक असतो.
हा चित्रपट केवळ माहितीपट नसून, त्यामुळे थोडेफार ‘फिल्मी’ होण्याचे धाडस लेखक - दिग्दर्शकाने केलेही असले, तरी ते १९ व्या शतकाचा कालखंड वा स्थळ, काळ, व्यक्तीविपर्यास करणारे वाटले नाही. खास करुन संगीत एकंदर कथेत चपखल बसले आहे. नवोदित तंत्रज्ञ, कलाकारांना शिकण्यासाठी हा चित्रपट एक उत्तम पर्याय ठरू शकेल. तांत्रिक, कलात्मकदृष्ट्या इतकेच नव्हे तर अभिनयाच्या बाबतीतही हा चित्रपट ‘ए वन’ आहे. त्यामुळे इफ्फित त्याचा लाभ घेणे ‘तो बनता है...’
(लेखिका नामवंत सिनेभाष्यकार आहेत.)