राज्यात योजना मुबलक; पण प्रतिसाद कमी

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची खंत; साखळीत कर्ज वितरण मेळावा उत्साहात


06th October 2019, 06:19 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

डिचोली : राज्यात अनेक योजना असणारे गोवा हे  देशातील एकमेव राज्य  असूनही  या योजनांची  अतिशय कमी  लोकांना माहिती आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लोक पुढेच येत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त 

केली.

साखळी रवींद्र भवनात विविध लघु उद्योजक तथा व्यावसायिकांसाठी  राष्ट्रीयकृत बँकांतर्फे  आयोजित  मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. भारतीय स्टेट बँक, वित्त मंत्रालयाचा वित्त सेवा विभाग व इतर राष्ट्रीयकृत बँकांनी या कर्ज पुरवठा मेळाव्याचे आयोजन केले होते. ‘सणांचा रंग, मन मे उमंग, बँकोंके संग’ नावाने भरवलेल्या या मेळाव्यात आर्थिक क्षेत्राशी निगडित २२ संस्थांनी भाग घेतला. मेळाव्यात सुलभरीतीने कर्ज वितरित व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सणांच्या निमित्ताने उपलब्ध केलेल्या कर्ज योजनांची माहितीही देण्यात येत होती.  यावेळी दौलत हवालदार, जी. रवींद्रनाथान, प्रशांत नाईक, अमूल्या कुमार, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी लोकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती योजना यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.  गोव्यात योजना मुबलक असूनही लाभ घेणारे कमी आहेत. कृषी, दूध उत्पादन व्यवसाय आदी बाबतींत कर्ज सुविधा घेऊन उत्कर्ष साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.

हवालदार यांनी सर्व सहभागी बँकांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्ज वितरण पत्रे तसेच मुलांना ‘पास बुक’ वितरण करण्यात आले.