वनअधिकाऱ्यांना करंझोळ, कुमठोळमध्ये ‘नो एन्ट्री’

सत्तरी भूमिपुत्र संघटनेचे आंदोलन तीव्र; गावांच्या सीमांवर उभारला ‘प्रवेश बंदी’चा फलक


06th October 2019, 06:16 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता 

वाळपई : जमीन मालकांना त्यांच्या जमिनींचा मालकी हक्क मिळावा, यासाठी सत्तरी भूमिपुत्र संघटनेने सुरू केलेला लढा शनिवारी तीव्र करण्यात आला आहे. सावर्डे पंचायत क्षेत्रातील करंझोळ व कुमठोळ भागांतील ग्रामस्थांनी गावांच्या सीमांवरच अभयारण्य व्यवस्थापन आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांना प्रवेशबंदी करणारा फलक उभारून आंदोलनाची धार वाढवली 

आहे. 

गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत सत्तरी तालुक्यातील जमीन मालकीचा प्रश्न अजूनही अधांतरीच राहिलेला आहे. याशिवाय वनक्षेत्रात राहणाऱ्यांवर अभयारण्य विभागाकडून अधिसूचना जारी करून जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. याविरोधात सत्तरी भूमिपुत्र संघटनेना दीर्घ काळापासून लढा देत आहे. या आंदोलनाची धग आता हळूहळू वाढवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर करंझोळ व कुमठोळ गावांच्या सीमांवर अभयारण्य व्यवस्थापन आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांसाठी ‘नो एन्ट्री फॉर फॉरेस्ट’ असा फलक उभारण्यात आला. शनिवारी सकाळी धार्मिक पद्धतीने फलक उभारण्यात आला. तत्पूर्वी येथील देवस्थानचे बातू गावडे यांनी फलकासाठी सपत्नीक भूमिपूजन केले. फलक उभारल्यानंतर वासू गावडे आणि कृष्णा गावडे यांनी सार्वजनिक स्वरूपाचे गाऱ्हाणे घातले. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा फलक काढून टाकण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र गावस, रणजीत राणे, विश्वेश परब व आंतानियो पिंटू यांनी याप्रसंगी प्रशासकीय यंत्रणांवर टीका केली. 

सत्तरी भूमिपुत्र संघटनेचा इशारा
 सत्तरी तालुक्यातील हे आंदोलन ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. जोपर्यंत जमिनींचा मालकी हक्क प्राप्त होत नाही व अभयारण्य विभागाची अधिसूचना रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलनाची धग कायम राहील.
 राजकीय डावपेच रचून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाल्यास किंवा भूमिपुत्रांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्यास या भागातील जनता डावपेच रचणाऱ्याला कदापि सहन करणार नाही.
गोवा मुक्तीनंतरही भूमिपुत्र पारतंत्र्यात ! 
सत्तरीतील भूमिपुत्रांना शेकडो वर्षांपासून ताब्यात असलेल्या जमिनींचा मालकी हक्क देण्यासाठी मुद्दामपणे टाळाटाळ केली जात आहे. यामुळे गोवा मुक्तीनंतरही या भागांतील भूमिपुत्र पारतंत्र्यात जगत आहेत. आताची पिढी सुशिक्षित आहे. आमच्या पूर्वजांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन या भागातील राजकारण्यांनी सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला; मात्र येणाऱ्या काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा सत्तरी भूमिपुत्र संघटनेने दिला आहे.
सत्तरीतील आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्यांच्या विरोधात नाही. केवळ स्वतःच्या अस्तित्वाचा हा लढा आहे. आतापर्यंत भूमिपुत्रांत फूट पाडून त्याची मजा घेण्यात राजकारण्यांनी धन्यता मानली. 
— हरिश्चंद्र गावस, अध्यक्ष, सत्तरी भूमिपुत्र संघटना