सौरभ वर्माला अजिंक्यपद

व्हिएतनाम ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १००


16th September 2019, 09:57 am
सौरभ वर्माला अजिंक्यपद

हो ची मिन सिटी :भारतीय बॅडमिंटन खेळाडू सौरभ वर्माने रविवारी येथे व्हिएतनाम ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १०० टुर्नामेंटमध्ये किताब पटकावला. पुरुषांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत त्याने चीनच्या सून फेई शियांगचा पराभव केला.
दुसरे मानांकन प्राप्त सौरभने ७५ हजार डॉलर बक्षीस रकमेच्या टुर्नामेंटमध्ये एक तास १२ मिनिटांपर्यंत चाललेल्या अंतिम फेरीत २१-१२, १७-२१, २१-१४ने ​चिनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. राष्ट्रीय चॅम्पियन सौरभने यावर्षी हैदराबाद ओपन व स्लोवेनियाई आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्येही किताब पटकावालेला आहे.
जागतिक क्रमवारीत ३८व्या स्थानावर काबिज असलेला सौरभ आता २४ ते २९ सप्टेंबर दरम्यान आयोजित होणाऱ्या कोरिया ओपन विश्व टूर सुपर ५०० टुर्नामेंटमध्ये खेळणार असून या स्पर्धेची बक्षीस रकम चार लाख डॉलर आहे.
सौरभने पहिल्या गेममध्ये आपला दबदबा निर्माण करत सुरुवात केली व ४-०ने आघाडी घेतली व ब्रेकपर्यंत ११-४ने तो पुढे गेला. ब्रेकनंतरही त्याने आपली लय कायम राखली व स्कोअर १५-४ असा केला. सूनने पुनरागमनाचा प्रयत्न केला मात्र सौरभने पहिला गेम सहज जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सूनने शानदार खेळ केला व ८-०ने आघाडी घेतली. ब्रेकपर्यंत त्याने आपली आघाडी ११-५ने वाढवली होती. ब्रेकनंतर सौरभ संघर्ष करताना दिसून आला व याचा फायदा सूनने उचलत गेम आपल्या नावावर केला. निर्णायक गेमच्या सुरुवातीला २६ वर्षीय सौरभ २-४ने पिछाडीवर होता मात्र ब्रेकपर्यंत त्याने ११-७ने आघाडी कायम केली.
चिनी खेळाडूने त्याला आव्हान दिले मात्र भारतीय खेळाडूने आपली आघाडी कायम राखली. सौरभ जेव्हा १७-१४ने पुढे होता तेव्हा त्याने सलग चार गुण मिळवत चिनी खेळाडूचे किताब जिंकण्याचे स्वप्न धुळीस ​मिळवले. मध्य प्रदेशमधील या खेळाडूने मागच्या वर्षी डच आशपन आणि कोरिया ओपन किताब जिंकला आहे.