पंकजला कारकिर्दीतील २२वा किताब


16th September 2019, 09:57 am
पंकजला कारकिर्दीतील २२वा किताब

मंडाले :भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणीने रविवारी येथे १५० अप फॉर्मेटमध्ये सलग चौथा आयबीएसएफ विश्व बिलियर्ड्स किताबासह आपल्या कारकिर्दीतील २२वा किताब जिंकला. बिलियर्ड्सच्या सर्वांत लहान प्रकारात ३४ वर्षीय अडवाणीचा मागच्या सहा वर्षांत हा पाचवा किताब आहे.
मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षीही अडवाणीने अंतिम फेरीत स्थानिक दावेदार नेम थ्वाय ओ केविरुद्ध ६-२ असा एकतर्फी विजय मिळवला. अडवाणीने सामन्याला शानदार सुरुवात केली व १४५, ८९ आणि १२७ ब्रेकसह लवकर ३-० अशी आघाडी घेतली.
थ्वाय ओने ६३ आणि ६२च्या ब्रेकसह पुढील फ्रेम जिंकला. अडवाणीने यानंतर १५० चा ब्रेक व ७४च्या ब्रेकसोबत सहज सामना जिंकला व थ्वाय ओला सलग दुसऱ्यांदा रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
बगळुरूच्या अडवाणीपेक्षा जास्त विश्व क्यू किताब एकाही खेळाडूला पटकावता आले नाही. अडवाणीने २२वा विश्व किताब जिंकल्यानंतर सांगितले, प्रत्येक वेळा मी विश्व चॅम्पियन शिपमध्ये सहभाग घेतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट असते, की माझ्या प्रेरणामध्ये कोणतीही कमी नसते. या विजयामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की, माझ्यात अजूनही विजयाची भूक आहे.
अडवाणीला २४ तासांमध्ये स्नूकरमध्ये सूर मिळवावा लागेल कारण त्याला आयबीएसएफ विश्व ६ रेड स्नूकर व विश्व टीम स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घ्यायचा आहे.