कविंदर सिंग बिष्ट उपउपांत्यपूर्व फेरीत


16th September 2019, 09:56 am
कविंदर सिंग बिष्ट उपउपांत्यपूर्व फेरीत

एकातेरिनबर्ग :आशियाई रौप्य पदक विजेता कविंदर सिंग बिष्टने (५७ किलो वजनी गट) रविवारी रशियात चालू असलेल्या विश्व पुरुष मुष्टियुद्ध स्पर्धेत चीनच्या चिना झिहाओचा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ५वे मानांकन प्राप्त भारतीय खेळाडूविरुद्ध चिनी मुष्टियोद्धा रक्तबंबाळ झाला होता व पंचांनी कविंदरच्या बाजूने ३-२ने निर्णय दिला.
भारतीय वायू सेनेत असलेल्या २६ वर्षीय या खेळाडूने २०१७ साली हॅमबर्गमध्ये झालेल्या विश्व चॅम्पियन​शिपच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास केला होता मात्र यावेळी तो पदकांच्या शर्यतीत सहभागी झाला आहे.
तत्पूर्वी दुसरे मानांकन प्राप्त व आशियाई चॅम्पियन अमित पांघल (५२ किलो) व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेता मनीष कौशिक (६३ किलो) दमदार विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले होते.
ही स्पर्धा टोकिओ २०२० ऑलिम्पिक क्वालिफाईंगसाठी होणार होती व यात पारंपरिक १० वजनी गटांऐवजी नवीन आठ (५२, ५७, ६३, ७४, ८१, ९१ व ९१ पेक्षा अधिक किलो) वजनी गट ठेवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघात (एआयबीए) बऱ्याच काळापासून चालू असलेल्या प्रशासनिक अनियमिततेंमुळे या स्पर्धेतून ऑलिम्पिक क्वालिफायरचा दर्जा काढून घेतला आहे.