एफडीएने परवाना रद्द केल्यामुळेच गोमेकॉतील कँटीनवर कारवाई

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती


15th September 2019, 06:30 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी : गोमेकॉतील बंद केलेल्या कँटीनचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) रद्द केला होता. तरीही ते कँटीन चालू होते, असा आरोप करीत, आपण कँटीन कंत्रााटदाराला कोणतीही धमकी दिली नसल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले.            

शुक्रवारी कारवाई करण्यात आलेल्या कँटीनमध्ये यापूर्वी अनेकदा अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले होते. रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही त्यासंदर्भातील तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे एफडीएने कँटीनचा परवाना २०१८ मध्ये रद्द केलेला होता. तरीदेखील हे कँटीन चालू होते. त्यामुळेच त्यावर कारवाई करण्यात आली, असे मंत्री राणे म्हणाले.             

गोमेकॉतील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि तेथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगला आहार देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. याआधी रुग्णांचे नातेवाईक तसेच विद्यार्थी यांना जेवणासाठी बाहेर जावे लागत होते. तेथील अनेक कँटीनमधून निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात होते. बऱ्याचदा तेथील जेवणात मेलेल्या पाली आढळून आल्या आहेत. अशा जेवणाचा शरीरावर परिणाम होऊ नये, यासाठीच सोडेक्सो कंपनीची निवड करून त्याद्वारे सकस आहार पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.            

गोमेकॉतील सोडेक्सोच्या कँटीनमध्ये काम करण्यासाठी अनेक भागांतील स्थानिक युवकांना विचारणा करण्यात आली होती. पण स्थानिक युवकांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी हवी आहे. त्यामुळे त्यांनी हे काम करण्यास नकार दर्शविला, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.