आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आम्हाला नाही का ?

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे कँटीन कंत्राटदार रंजन मयेकर यांचा सवाल


15th September 2019, 06:28 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता            

पणजी : आमच्या कुटुंबात एकही सरकारी कर्मचारी नाही. सरकारी नोकरीच्या मागे न धावता स्वत:च्या बळावर उद्योग, व्यवसाय करून आत्मसन्मानाने जगण्याचा प्रयत्न मयेकर कुटुंबियांनी केला आहे. सरकारकडून मुळात अशा कुटुंबियांना मदतीचा हात देणे अपेक्षित आहे, पण आत्मसन्मानाने जगणे हा गुन्हा असून इथे केवळ लाचार म्हणूनच गोमंतकीयांनी जगावे, अशीच सरकारची इच्छा आहे की काय, असा खडा सवाल रंजन मयेकर यांनी केला.            

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कँटीन सेवा देणाऱ्या मयेकर ब्रदर्स यांचे कँटीन शनिवारी इस्पितळ प्रशासनाकडून बळजबरीने बंद करण्यात आले. शनिवारपर्यंत कँटीन खाली करा, अशी नोटीस बजावली असताना शनिवारीच सकाळी ७ वाजता पोलिसांच्या मदतीने कँटीन बंद करून त्या दिवसाचे सगळे जेवण तथा इतर खाद्यपदार्थाची नासाडी करण्यात आली. या एकूणच प्रकाराबाबत या कँटीनचे कंत्राटदार तथा प्रसिद्ध नाट्यकलाकार रंजन मयेकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. अशा पद्धतीची हीन वागणूक कुणी गुन्हेगारांनाही देत नाही, परंतु कमिशनच्या पैशांमुळे अंध झालेल्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई करण्यात आली, असा आरोप मयेकर यांनी केला. गोमेकॉचे हे कँटीन यापूर्वी परप्रांतियाकडेच होते. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी ही कँटीनसेवा स्थानिकांकडे असावी, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर निविदा प्रक्रियेत भाग घेऊन या कँटीनचे कंत्राट मिळवले. निविदेत कँटीन मिळवल्यानंतर दोन वर्षे पूर्वीच्या कंत्राटदाराने कँटीन सोडले नव्हते. कँटीनचा ताबा घेतल्यानंतर तिथे अत्यंत दयनीय परिस्थिती होती. वास्तविक ही दुरुस्ती इस्पितळ प्रशासनाने करून देणे गरजेचे होते. पण प्रशासनाकडून काहीच हालचाली होत नसल्यामुळे स्वखर्चाने दुरुस्ती करून घेतली. 

गोमेकॉत उंदीर, घुशींचा मोठा वावर असतो. त्यांचा उपद्रव टाळण्यासाठी पक्के काम करून घेतले. रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर तसेच इतर लोकांना चांगली सेवा मिळावी, यासाठी अनेक सुविधा उभारल्या. अनेक सामान विकत घेतले. यात्री निवास आणि गोमेकॉची दोन कँटीन्स मिळून सुमारे ५० ते ७० लाख रुपयांचा खर्च आपण केला. या व्यतिरिक्त यात्री निवास कँटीनसाठी आपल्याकडून घेतलेले ५ लाख रुपयांचे डिपॉझिट अद्यापही आपल्याला परत केलेले नाही, असे ते म्हणाले.

 कँटीनची मुदत संपली होती, ही गोष्ट जरी खरी असली तरी नियमित भाडे आपण भरत होतो. आॅगस्ट महिन्यापर्यंत भाडे दिले आहे. आपली लाखो रुपयांची गुंतवणूक याठिकाणी झाल्याने आणखी काही काळ हे कँटीन मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करीत होतो, असे रंजन मयेकर यांनी म्हटले आहे. 

आरोग्यमंत्र्यांनी धमकी दिल्याचा दावा 

गोमेकॉचे कँटीन चालवण्याची मुदत वाढवून मिळावी, ही विनंती घेऊन आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे गेलो, ही खबर विश्वजीत राणे यांना मिळताच त्यांनी मध्यरात्री फोन करून पहाटेपर्यंत कँटीन खाली करा, अशी धमकी दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत, भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनाही अपशब्द वापरला. या संवादाचे रेकॉर्डिंग आपल्याकडे असून ते आपण मुख्यमंत्र्यांना ऐकवणार आहे, असे रंजन मयेकर म्हणाले. यानंतर पुन्हा एकदा मध्यरात्री मंत्री राणे यांच्या जवळच्या एका माणसाने फोन करून धमकीवजा भाषा वापरण्याचा प्रकार घडला, असे त्यांनी सांगितले.

५० गोमंतकीय कुटुंबे देशोधडीला लावल्याची टीका

यात्री निवास आणि गोमेकॉ कँटीन मिळून आपल्याकडे ५० हून अधिक कामगार होते. यांपैकी अनेक स्थानिक महिला होत्या. या महिला गोमंतकीय होत्या आणि गरीब कुटुंबातून येत होत्या. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा या नोकरीतून होत होता. विश्वजीत राणे यांनी आपल्या एका निर्णयातून या ५० कुटबियांना देशोधडीला लावले आहे. गोमंतकीयांच्या पोटावर लाथ मारून परप्रांतियांचा भरणा करण्याचे धोरण सरकारला राज्यात राबवायचे आहे की काय, असा सवाल रंजन मयेकर यांनी केला आहे.