उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी म्हणजे निव्वळ धूळफेक

सुदीप ताम्हणकर यांची टीका; राज्यात अंमलबजावणी न करण्याचीही मागणी


15th September 2019, 06:27 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                        

पणजी : उच्च सुरक्षा क्रमांकपट्टीचा वाहन सुरक्षेच्या दृष्टीने काहीही फायदा नाही. उच्च सुरक्षा क्रमांकपट्टीच्या जागी बनावट पट्टी लावूनही वाहनांची चोरी केली जाऊ शकते. त्यामुळे सरकारने केवळ दंड जमविण्यासाठी या पट्टीची अंमलबजावणी करण्याचे ठरविले असून, हा वाहन मालकांवरील फार्स आहे, अशी टीका माहिती हक्क कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी शनिवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना केली.                    

राज्यात १ एप्रिल २०१९ पासून नोंदणी होणाऱ्या नव्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी सक्तीची करण्याचा निर्णय लागू झाला आहे. त्यानंतर आता यापूर्वीच्या वाहनांसाठीही या क्रमांकपट्ट्या बसविण्यासाठीचे वेळापत्रक आणि दरपत्रक वाहतूक खात्याने जारी केले आहे. वाहतूक कायद्यांतर्गत सक्ती करण्यात आलेल्या या क्रमांकपट्ट्या बसविण्यासाठी राज्य सरकारतर्फे मेसर्स रिअल मेझोन इंडिया लिमिटेड (आरएमआयएल) या कंत्राटदाराची निवड केली आहे. वाहतूक खात्याकडून यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली असून, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी या क्रमांकपट्ट्या बसविण्यासाठी १ आॅक्टोबर २०१९ पासून सुरुवात होणार आहे. शिवाय ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत सर्व जुन्या वाहनांना या क्रमांकपट्ट्या लावण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ताम्हणकर म्हणाले, उच्च सुरक्षा क्रमांकपट्टीचा वापर प्रामुख्याने वाहनांच्या सुरक्षिततेसाठी केला जातो. पण ही पट्टी हटवून त्याजागी नवी पट्टी वापरून तसेच होलोग्राम चक्र असलेली काचही बदलून वाहनांची चोरी होऊ शकते. उच्च सुरक्षा क्रमांकपट्टीद्वारे वाहनांना सुरक्षा देण्यासंदर्भातील साधनसुविधा राज्यातील वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नाहीत. राज्याच्या हद्दीवरील तपास नाक्यांची अवस्था बिकट आहे. तेथे अनेक गैरसोयी आहेत. अशा परिस्थितीत राज्यात उच्च सुरक्षा क्रमांकपट्टीची अंमलबजावणी करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. इतर अनेक देशांत उच्च सुरक्षा क्रमांकपट्टीचा वापर केला जातो. पण त्यासाठी आवश्यक चीफ, डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे आदी गोष्टी चेकपोस्टवर उपलब्ध केलेल्या असतात. पण भारतात केवळ नावापुरता या पट्टीचा वापर केला जात असून, याद्वारे केंद्र सरकार निव्वळ धूळफेक करीत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पोलिसांनी दक्ष राहणे गरजेचे 

राज्यातील वाहनांना सुरक्षा द्यायची असेल, तर वाहतूक पोलिस आणि तपास नाक्यांवरील पोलिसांनी दक्ष राहून काम करणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी तपास नाक्यांवरून राज्यात दाखल होणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तसेच त्यावरील चालकाकडील कागदपत्रांची कसून तपासणी करणे गरजेचे आहे, असे मत सुदीप ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा