शारदा सावईकरांना मारहाण

गोमंतगाथा

Story: मनोहर जोशी |
14th September 2019, 11:33 am
शारदा सावईकरांना मारहाण


-
कुळागरात गेलेली शारदा घरात येताच तिलाही ओसरीवर बसविले आणि ‘किस्तोदला मारायला कोण होते तुझ्याबरोबर?’ असा प्रश्न विचारला. त्यावर बाणेदार शारदाने ‘मी किस्तोदला ओळखत नाही. कोण किस्तोद?’ असा उलटा प्रश्न विचारला. पोलिसांनी सगळ्या घरात शोध घेतला. पण, काहीच सापडले नाही. तरीही मोंतैरोने शारदा व त्यांचे थोरले बंधू विश्वनाथ यांना पकडून नेले आणि किस्तोद ज्या घरात राहत होता त्याच घरात वेगवेगळ्या खोल्यांत बंदिस्त केले.
सकाळी या दोघांना पकडून नेले, त्याच दिवशी संध्याकाळी पणजीला अटकेत असलेल्या गणपतची चौकशी करून आईवडील संध्याकाळी घरी परत आले. घरी येऊन बघतात तर या दोघांना पकडून नेलेले. दोघांनाही जबरदस्त धक्का बसला. पण करणार काय? शारदा व विश्वनाथ या दोघांना पकडून नेल्यानंतर संपूर्ण दिवस व रात्र त्या दोघांना पाण्याचा थेंबसुद्धा दिला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना पणजीला नेले. तेथे श्रीमती शारदा यांना पोलिस चौकीच्या व्हरांड्यात उभं राहण्यास सांगितले. संपूर्ण दिवस व रात्र त्या उभ्या होत्या. दोन दिवसांचा निर्जळी उपवास. संध्याकाळी त्यांच्या घशाला कोरड पडली म्हणून त्यांनी एका पोलिसाला पाणी देण्याची विनंती केली. त्याने पाण्याचा ग्लास आणला आणि त्यांच्या हातात देणार तोच मोंतैरो तिथे आला आणि ग्लासावर काठी मारून तो फोडला. दोन दिवस अन्न पाण्यावाचून उभ्या असलेल्या एका निरपराध स्त्रीला साधं पाणीही पिऊ न देणारा मोंतैरो किती नीच असावा, याची कल्पना येते.
त्या दिवशी रात्री दोन वाजता श्रीमती शारदा यांना मोंतैरोच्या खोलीत नेले. तिथे गेल्यावर पुन्हा तोच प्रश्न, ‘किस्तोदला कोणी मारले?’
‘माहीत नाही,’ शारदा यांचे उत्तर. त्यावर चिडून जाऊन दोन दिवस उपाशी असलेल्या शारदा यांना कावलमारीने जबरदस्त मारहाण करून एका खोलीत ढकलून देण्यात आले. तीन दिवसानंतर त्यांना दुसऱ्या एका कोठडीत नेण्यात आले. तिथे त्यांचा बंधू गणपत होता. बेदम मारहाण करून त्यांचे अंग काळे- निळे पडले होते. डोळे सुजले होते. मारहाणीमुळे धड उभेही राहता येत नव्हते. त्याच्याकडे बोट दाखवून मोंतैरो गरजला, ‘हा जिवंत राहायला पाहिजे असेल तर तुला काय माहीत आहे ते सांग.’ क्षणभर त्यांच्या मनाची चलबिचल झाली. पण, प्रखर राष्ट्रभक्त असलेल्या शारदानी निग्रही स्वरात सांगितले, ‘मला माहीत नाही.’ त्याबरोबर गणपतला त्याच्या कोठडीत पाठवण्यात आले आणि रानटी, खुनशी, निर्लज्ज, निर्दयी या सर्व संज्ञा लागू पडणाऱ्या पोलिसांनी शारदा यांना कावलमारीने मारहाण करण्यास सुरुवात केली. सर्व अंग काळे निळे पडले. डोळे सुजले. तोंडावर मारलेल्या ठोशांनी त्यांचे दात पडले. तोंडातून रक्त वाहू लागले. त्याच अवस्थेत त्यांना त्यांच्या कोठडीत टाकण्यात आले.
कोठडीत शारदा यांचे फार हाल झाले. कोठडीत अंथरूण पांघरूण काहीही नव्हते. थंड फरशीवरच झोपावे लागे. पंधरा दिवसांनी त्यांना पुन्हा त्या कोठडीत नेण्यात आले. पुन्हा बेदम मारहाण केली. इतकी की त्यात त्यांचे आणखी काही दात पडले. रात्री एक डॉक्टर येऊन त्याने सर्व जखमांवर ‘टिंक्चर’ लावले. असह्य वेदना झाल्या. पण, त्या सोसण्याखेरीज पर्याय नव्हता.
श्रीमती शारदा यांचे जेवणाखाण्याच्या बाबतीतही फार हाल केले. त्या शुद्ध शाकाहारी आहेत, हे कळल्यावर भातावर मासळीचे कालवण घातलेले जेवण त्यांना मुद्दाम पाठविण्यात येई. सुरुवातीला काही दिवस त्यांनी काहीही खाल्ले नाही. नंतर भाताच्या ज्या भागाला कालवण लागलेले नाही अशी भाताची काही शिते त्या खात. म्हणजे जवळजवळ रोजच उपास. श्रीमती शारदा यांना किती यातना सहन कराव्या लागल्या असतील याची कल्पनाही करवत नाही. या मुक्तिसंग्रामात सावईकर कुटुंबाला असीम यातना सहन कराव्या लागल्या. गणपत, विश्वनाथ, श्रीकांत, सदानंद या सर्वांना देहदंड व तुरुंगवास सोसावा लागला. श्रीमती शारदा यांना कोर्टाने दोषमुक्त करूनही सरकारने त्यांना तीन वर्षे तुरुंगात ठेवले. पद्माकर सावईकर यांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रासाबरोबरच तुरुंगवासही भोगावा लागला. म्हणजे एकाच कुटुंबातील पाच भावंडे आणि कुटुंबप्रमुख यांनी या संग्रामात अपार देह दंड सोसले.
सावईवेऱ्यातील हे सूडसत्र इथेच थांबले नाही. स्वातंत्र्यसैनिक सर्वश्री माधव कोरडे, प्रमोद कोरडे, यांना अटक केली. पोंबुर्पा येथील सीताराम कुबल, कालापूर येथील व्यवसायाने अनुक्रमे ड्रायव्हर व शिंपी असलेले शिवराम साळगावकर व सगुण साळगावकर, लक्ष्मण हडकोणकर, व्यवसायाने धोबी असलेले गोपाळ कोळगावकर, पुतण्या काशिनाथ कोळगावकर, श्रीधर सुर्लीकर, दामोदर भट वझे, पांडुरंग भट बोरकर अशी पकडून नेलेल्यांची यादी फार मोठी आहे.
पोर्तुगीज पोलिसांची चौकशीची पद्धत म्हणजे जबरदस्त मार देऊन गुन्हा केलेला असो व नसो तो कबूल करून घेणे व त्याच्यावर कोर्टात खटला दाखल करणे. चौकशी करत असताना थपडा, गुद्दे मारणे, जळत्या सिगारेटचे चटके देणे, नग्न करून सर्वांगावर कावलमारीने फटके देणे, गुदद्वारात काठी ढोसणे व बर्फाचे तुकडे घालणे अशा या अघोरी प्रकारांचा समावेश होता.
यामुळे बऱ्याच वेळा वेदना सहन न होऊन कैदी त्याचे मानसिक संतुलन हरवून बसे किंवा त्यातच त्याचा मृत्यू होई. तुळशीदास कामत व प्रभाकर वेरेकर हे या प्रकाराचे बळी ठरले. तुळशीदास हे पोस्टमन होते तर प्रभाकर यांचे दुकान होते. तुळशीदास व प्रभाकर यांचा पणजीच्या कोठडीत मृत्यू झाला. गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामातील ते अनुक्रमे चौथे व पाचवे बळी ठरले. (क्रमश:)
(संदर्भ : स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, खंड- २, भाग- १ पृष्ठ- ३०९ ते ३१६)