खडतर महापरीक्षेत गोव्याच्या ‘प्रियव्रत पाटील’चा इतिहास

अवघ्या सोळाव्या वर्षी कंची मठाच्या महापरीक्षेत उत्तीर्ण


11th September 2019, 05:48 pm

पणजी : दक्षिण गोव्यातील रिवण येथील १६ वर्षांच्या प्रियव्रत पाटील या मुलाने  सर्वांत कमी वयात ‘महापरीक्षा’ उत्तीर्ण होत इतिहास रचला. वयाच्या सोळाव्या वर्षी प्रियव्रतने ‘तेनाली’ परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध १४ स्तरांमध्ये  यश मिळवले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे त्याचे अभिनंदन केले आहे. 

अपर्णा आणि देवदत्ता पाटील यांच्या सोळा वर्षांच्या मुलाने हा इतिहास रचला. आपल्या वडिलांकडून वेद व न्यायशास्त्राचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्याने सर्व व्याकरण महाग्रंथांचे मोहन शर्मा यांच्याकडून शिक्षण घेतले. यासोबतच तेनाली परीक्षेच्या विविध १४ स्तरांमध्ये घवघवीत यश मिळवून सर्वांत कमी वयात ‘महापरीक्षा’ उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला, असे ट्विट चामू कृष्णाशास्त्री यांनी  करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले होते. त्याला उत्तर देताना पंतप्रधानांनी प्रियव्रत पाटीलचे अभिनंदन केले.

प्रियव्रत सध्या तेनाली येथे असून तो महागुरुंचे आशीर्वाद घेण्यासाठी आंध्रप्रदेश मधील विजयवाडा येथे गेला आहे. तेथून ११ रोजी सोलापूर येथे जाऊन १२ सप्टेंबरनंतर गोव्यात परतणार आहे. 

तेनाली येथून प्रियव्रतच्या यशाबद्दल बोलताना त्याची आई अपर्णा पाटील म्हणाल्या, प्रियव्रत  व्याकरण  शास्त्राची महापरीक्षा  प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. चेन्नई येथे कांची शंकराचार्य पीठातर्फे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा  अतिशय कमी वयात उत्तीर्ण होणारा प्रियव्रत हा पहिलाच छात्र ठरला. संस्थेच्या १०० ते १५० वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेऊन संस्था संचालकांनी मला हे सांगितले, असे अपर्णा यांनी म्हटले आहे.                        

प्रियव्रतचे वडील पं. देवदत्त हे ‘न्यायशास्त्र’ व ‘व्याकरण’ या दोन्ही शास्त्रांतील प्रकांड पंडित असून ते गोव्यात रिवण या गावात निवासी पाठशाळा चालवतात. विद्यार्थ्यांना मोफत ज्ञानदान करतात आणि विशेष म्हणजे जातीभेदाच्या भिंती तोडून सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना शास्त्राचे शिक्षण देतात.                        

ज्ञानदानाचे शुल्क घेणार नाही, असे वचन त्यांच्याकडून घेतल्यावरच त्यांच्या गुरूंनी त्यांना शास्त्र शिकवले होते. 

कांची मठाच्या देखरेखीखाली होते महापरीक्षा

महापरीक्षा देणारे विद्यार्थी आपल्या गुरूंसोबत देशाच्या विविध भागांत राहतात आणि पारंपरिक ‘गृह गुरुकुल’ प्रणालीनुसार शिक्षण घेतात. वर्षातून दोनदा सर्व गुरु व विद्यार्थी त्यांच्या लेखी व तोंडी परीक्षेसाठी तेनाली येथे एकत्र येतात. विद्यार्थ्यांच्या ५ ते ६ वर्षांच्या अभ्यासानंतर कांची मठाच्या देखरेखीखाली महापरीक्षा घेतली जाते. गेल्या ४० वर्षांमध्ये, ‘तेनाली परीक्षा’ शास्त्र अभ्यासाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था ठरली आहे. ‘इंडिक अकादमी’ सध्या विविध शास्त्रांच्या अभ्यासासाठी ४० विद्यार्थ्यांना मदत करत आहे.

 प्रियव्रतने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन. त्याने मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रियव्रतच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. 

हेही वाचा