नोकरभरती रद्द करून बेरोजगारांची थट्टा

गिरीश चोडणकर यांचे मुख्यमंत्री सावंत यांच्यावर टीकास्त्र

11th September 2019, 05:48 Hrs

पणजी : विविध सरकारी खात्यांनी रिक्त पदे भरण्यासाठी दिलेल्या जाहिराती मागे घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. ही बेरोजगार युवक आणि त्यांच्या पालकांची क्रूर थट्टाच आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांत यश मिळवण्यासाठी भाजपने  मागील दोन वर्षांत युवकांना ‘नोकरीचे गाजर’ दाखवले. पण, भाजप सरकारला गोमंतकीयांना नोकरी व व्यवसाय देण्यात अजिबात रस नाही, हेच सत्य आहे, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

गोव्यात खाण व्यवसाय सुरू करण्याचे खोटे आश्वासन देऊन भाजप खाण अवलंबातांची फसवणूक करत आहे. काळा पैसा परत आणून जनतेच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख भरण्याचे जसे फसवे नाटक भाजपने केले, त्याच नाटकाचा प्रयोग गोव्यात खाणींच्या बाबतीत करण्यात आला. सत्ता मिळवण्यासाठी अशी आश्वासने दिली गेली, असा आरोपही चोडणकर यांनी केला आहे.

एनडीए सरकारात असल्याचे सांगणाऱ्या एका स्थानिक पक्षाचा पदाधिकारी अप्रत्यक्ष भागीदार असलेल्या मुंबईच्या कंपनीस, सर्व नियम धाब्यावर बसवून गोवा पर्यटन मेळाव्याचे काम देण्यात आले आहे, असा दावाही चोडणकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इतर पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय करून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या नातेवाईकाला प्रवेश दिला, भाजपच्या केंद्रीय नेत्याच्या नातेवाईकाला रस्ते, जलवाहिनी यांची कामे देण्यात आली. फातोर्डा स्टेडियमच्या दुरुस्तीच्या कंत्राटात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होऊनसुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

भाजपच्या गोव्यातील एका पदाधिकाऱ्याच्या मुलाचे गोव्यातील किनारी स्वच्छता कंत्राटात संबंध आहेत. मेरशीतील न्यायालय संकुलाचे काम जाणीवपूर्वक पुढे ढकलण्यात आले आहे. हे न्यायालय सध्या पाटो येथील खासगी भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. एका माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीस लाभ व्हावा, यासाठी हा प्रकार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देशातील उद्योग बंद; नोकऱ्यांवर गदा

केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची व राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. आॅटोमोबाईल्स, रिअल इस्टेट, उद्योग, शेती, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रावर मंदीचे संकट आले आहे. देशातील लाखो लोकांना नोकऱ्यांवरून काढुन टाकण्यात आले आहे. अनेक उद्योग बंद झाले आहेत, असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

Related news

कर्नाटकचे मंजुरीपत्र; नियोजित डावाचा संशय

म्हादई : वन, वन्यजीव परवान्यासाठी कर्नाटकची सल्लागार नियुक्ती निविदा Read more

Top News

कर्नाटकचे मंजुरीपत्र; नियोजित डावाचा संशय

म्हादई : वन, वन्यजीव परवान्यासाठी कर्नाटकची सल्लागार नियुक्ती निविदा Read more