३ वर्षांनंतर फेरमतमोजणीअंती वाढली ४ मते

गोवा नागरी सहकारी बँकेवर न्यायालयीन शुक्लकाष्ट सुरूच


11th September 2019, 05:46 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                        

फोंडा : गोवा अर्बन सहकारी बँकेच्या मे २०१७ मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर या बँकेला न्यायालयीन शुक्लकाष्टाची लागलेली पिडा अजूनही कायम आहे. बँक निवडणुकीत पराभूत झालेले जॉन मार्टिन्स डिकॉस्टा यांच्या फेतमतमोजणीच्या याचिकेवर जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या निवाड्याअंती मंगळवारी झालेल्या निकालात त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. गोविंद कामत हेच विजयी ठरले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फेरमतमोजणीत डॉ. कामत यांची चार मते वाढली.             

राज्यातील एक आघाडीची आणि चांगल्या आर्थिक परिस्थितीत असलेली सहकारी बँक म्हणून गोवा अर्बन सहकारी बँकेची आेळख आहे. खाणबंदीमुळे मात्र या बँकेसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. या बँकेची निवडणूक मे २०१७ मध्ये झाली असता डॉ. अनिल गावणेकर यांच्या पॅनलाने त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. गोविंद कामत पॅनलवर ५ विरुद्ध ४ अशी मात केली. बँकेचा ताबा डॉ. गावणेकर यांच्याकडे जाणार, हे स्पष्ट होऊनही सहकार निबंधकांकडून बैठक बोलावण्यास विलंब करण्यात आला. मध्यंतरी दोन्ही गटांकडून संचालकांना एकमेकांकडे आेढण्याचेही प्रकार सुरू झाले. दरम्यान, दोन रिक्त संचालकपदांसाठी सहकार निबंधकांकडून सोनिया कुंकळ्ळीकर आणि दुलो प्रभू गावडे यांची नियुक्ती करण्यात आली. हे दोन्ही संचालक डॉ. कामत यांच्या मर्जीतील असल्याचे लक्षात येताच आणि बहुमत प्राप्त करूनही बँक विरोधकांच्या हाती जात असल्याचे लक्षात येताच डॉ. गावणेकर यांनी सहकारी निबंधकांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाने या दोन्ही संचालकांची नियुक्ती रद्दबातल ठरवली. सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि तिथेही डॉ. गावणेकर यांची बाजू उचलून धरल्यानंतर अखेर ही नियुक्ती रद्द करण्यात आली. या पदांवर अखेर रिटा वासुदेव दुकळे आणि केशव केरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नियुक्तीनंतर डॉ. गावणेकर गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आणि त्यानंतर त्यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.             

हा वाद संपून बँकेचा कारभार योग्य मार्गी लागला असतानाच डॉ. गोविंद कामत यांच्याविरोधात निवडणुकीत पराभूत झालेले जॉन मार्टिन्स डिकॉस्ता यांनी फेरमतमोजणीसाठी सहकार निबंधकांकडे धाव घेतली. सहकार निबंधकांनी ही मागणी फेटाळल्यानंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. अखेर सत्र न्यायालयाने त्यांची ही मागणी उचलून धरली आणि सहकार निबंधकांना फेरमतमोजणीचे आदेश दिले.

डॉ. गोविंद कामत यांना २,५३२ मते

मंगळवारी फोंडा येथील सहकार निबंधकांच्या कार्यालयात फेरमतमोजणीची प्रक्रिया पार पडली. तीन वर्षांपूर्वी झालेल्या मतमोजणीनंतर सीलबंद केलेल्या पेट्या पुन्हा उघडून ही मतमोजणी केली गेली. निवडणूक अधिकारी स्मिता काणकोणकर यांनी या फेरमतमोजणीअंती डॉ. गोविंद कामत यांना २,५३२ तर जॉन यांना २,४९९ मते मिळाल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे फेरमतमोजणीअंती गोविंद कामत यांची चार मते वाढली.