बदलती जीवनशैली हेच आत्महत्येचे मूळ : तेंडुलकर

व्यक्त न होण्याच्या स्वभावामुळे पुरुषांमध्ये नैराश्येचे प्रमाण अधिक


10th September 2019, 05:53 pm

शेखर नाईक

गोवन वार्ता

फोंडा : दरवर्षी १० सप्टेंबर हा ‘जागतिक आत्महत्या निर्मूलन दिन’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर फोंड्यातील ‘सोल हिलिंग’ संस्थेच्या प्रमुख तथा संमोहनशास्त्राच्या तज्ज्ञ आदिती तेंडुलकर यांनी ‘गोवन वार्ता’शी साधलेला संवाद अत्यंत दिशादर्शक ठरेल. अदिती या मडगावातील ‘ऊर्जा वेलनेस’ आणि पणजीतील समविचारी संस्थेशी संबंधित आहेत. त्याचबरोबर फोंड्यातील आयएमए संचालित ‘दिलासा’ या संस्थेतही त्या योगदान देतात.

अपयश, प्रेमभंग, घटस्फोटांमुळे येते निराशा

बदलत्या जीवनशैलीमुळे आलेल्या ताणतणावातून हल्ली आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. मानसिक आजार, प्रेमभंग, घटस्फोट यांसह जीवनात आलेले अपयश ही आत्महत्या करण्यामागची प्रमुख कारणे आहेत. मानसिक ताणतणावाचा सामना करणाऱ्यांसाठी फोंड्यात ‘सोल हिलिंग’ ही संस्था चालू केली आहे. संस्थेने अवघ्या सहा-सात महिन्यांच्या कालावधीत सुमारे सव्वाशे रुग्णांना समुपदेशन आणि मार्गदर्शन केले आहे. आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीसाठी शेवटचा पर्याय नसून जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याचा मार्ग संस्था दाखवते, अशी माहिती अदिती यांनी दिली.

बहुतेक वेळेस आत्महत्येला मानसिक ताणतणाव कारणीभूत असतो. किशोरवयीन मुलांमध्ये अपयशातून आलेले नैराश्य, प्रेमभंग हे घटक कारणीभूत असतात, असे आढळून आले आहे. आत्महत्या टाळण्यासाठी आजवर अनेक शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी शिबिरे घेतली असून महिला पोलिस दलासाठीही ताणतणावमुक्त जीवनावर शिबिर घेतले आहे, असे आदिती यांनी सांगितले.व्यक्त न होण्याने वाढतो तणाव

आदिती यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या जास्त असते. पुरुष सहसा व्यक्त होत नाहीत. हाच दोष त्यांच्यातील ताणतणाव वाढायला कारणीभूत ठरतो, असे त्यांच्या नजरेस आले आहे. घरगुती ताणतणावाच्या शिकार बनलेल्या अनेक महिलाही समुपदेशनासाठी त्यांच्याकडे येतात. याशिवाय मध्यमवयीन स्त्री-पुरुष त्यांच्याकडे समुपदेशनासाठी येतात. त्यांना ‘उतारवयात आपले कसे होईल’, याची अनाहुत भीती वाटत असते, असे आदिती यांनी सांगितले.

वागण्यातील अचानक बदल हेरणे आवश्यक

हल्ली विद्यार्थ्यांमध्येही आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या बदलत्या सवयींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे आदिती यांनी सांगितले. पाल्यांच्या दैनंदिन सवयीत बदल झाल्यास त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याने बरेच प्रश्न सुटू शकतात, असेही त्या म्हणाल्या. आत्महत्या ही क्षणिक विचाराअंती न होता, ती बहुतेक वेळा पूर्णपणे विचार करून घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे घरातील व्यक्तींच्या बदलत्या सवयी लक्षात आल्यास आत्महत्या  टाळता येणे सहज शक्य असल्याचेही त्यांनी नमुद केले.

आत्महत्या टाळण्यासाठी...

लोक आत्महत्येशी संबंधित घटनांवर सहसा चर्चा टाळली जाते. कारण अशी चर्चा आत्महत्येचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरेल, अशी काल्पनिक भीती लोकांमध्ये आहे. मात्र, हे चुकीचे आहे. अशा घटनांवरच चर्चा करून, त्यामागील कारणे समजून घेणे गरजेचे आहे. आत्महत्या टाळायच्या असल्यास लोकांनी अधिकाधिक व्यक्त होणे गरजेचे आहे, असा सल्ला आदिती तेंडुलकर यांनी दिला आहे. 

आदिती तेंडुलकर म्हणतात...

- धार्मिक वृत्तीच्या माणसांमध्ये आत्महत्येचे प्रमाण फारच कमी असल्याचे निरीक्षणास आले आहे. ज्या घराचा धार्मिक पाया मजबूत असतो, तेथे आत्महत्येचे प्रमाण अत्यल्प असते.

गेल्या मार्च महिन्यात चालू केलेल्या ‘सोल हिलिंग’च्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास पाच ते सहा लोकांना आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त केले आहे. संस्थेत चार अर्धवेळ समुपदेशक कार्यरत आहेत.