पोडवाळ येथील बंधारा दुरुस्तीचे आश्वासन

कृषी अधिकाऱ्यांकडून भगदाडाची पाहणी; खारे पाणी शिरल्याने भात शेतीचे नुकसान


10th September 2019, 05:48 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

म्हापसा : पोडवाळ-खोर्जुवे येथे पार नदीकाठच्या बंधाऱ्याला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याने लागवडीखालील सुमारे ७० हेक्टर खाजन शेती खाऱ्या पाण्याखाली गेली आहे. कृषी खात्याच्या संचालकांनी या प्रकाराची दखल घेतल्यानंतर सोमवारी सायंकाळी म्हापशाच्या विभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने या शेतीची पाहाणी केली व बंधारा दुरुस्त करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

कृषी संचालक माधव केळकर यांच्या आदेशानुसार सोमवारी विभागीय कृषी अधिकारी रघुनाथ जोशी व पथकाने पोडवाळ येथे जाऊन शेतीची तसेच फुटलेल्या बंधाऱ्याची पाहाणी केली. यावेळी पथकाने ‘धोकाचो दांत कूळ संघटनेचे सचिव तथा शेतकरी सखाराम नागवेकर यांच्याकडून घटनेची माहिती नोंद करून घेतली.

नागवेकर यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, तिलारी धरणाच्या पाण्याचा पार नदीत विसर्ग झाल्यामुळे पार नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे या बंधाऱ्याला तीन ते चार ठिकाणी भगदाड पडले आहे. एका ठिकाणी तर ८ ते १० मीटरचे मोठे भगदाड पडले आहे. त्याची दुरुस्ती करणे शक्य नाही. इतर एका भगदाडाची दुरुस्ती करण्यात आली आहे. मोठे भगदाड पडलेल्या ठिकाणी जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो.

‘गोवन वार्ता’च्या वृत्ताची गंभीर दखल

मंगळवार ३ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसामुळे खोर्जुवेच्या पार नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. याच फटका काठावरील बंधाऱ्याला बसला. या बंधाऱ्याला साधारण ८ ते १० मीटरचे भगदाड पडल्याने खारे पाणी ‘धोकाचो दांत’ या खाजन शेतीत घुसले. त्यामुळे भात शेतीचे नुकसान झाले. या घटनेचे वृत्त ६ सप्टेंबरला दै. ‘गोवन वार्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत कृषी संचालक माधव केळकर यांनी विभागीय अधिकाऱ्यांना पाहणीचा आदेश दिला होता.

कृषी खात्याकडून सर्वतोपरी सहकार्य : जोशी

खोर्जुवेतील पोडवाळ येथे बंधाऱ्याला चार ठिकाणी भगदाडे पडली आहे. चार पैकी तीन भगदाडे दोन ते अडीच मीटरची आहेत. पाहाणीवेळी सुमारे १० ते १५ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परंतु आठ दिवसांनंतर खाऱ्या पाण्यामुळे शेतीवर झालेला परिणाम दिसून येईल. त्यानंतर नुकसानीचा आकडा स्पष्ट होईल. या शेतकऱ्यांना आवश्यक मदत पुरवण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे, अशी माहिती कृषी अधिकारी रघुनाथ जोशी यांनी दिली.  

हेही वाचा