तेंडुलकरांनी खासदार निधीतून दिलेल्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचा शुभारंभ

औद्योगिक वसाहतीसाठी वाहन उपयुक्त ठरणार : मुख्यमंत्री डॉ. सावंत


18th August 2019, 05:25 pm

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : राज्यसभेचे खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी खासदार निधीतून गोव्यातील अग्निशामक दलासाठी दिलेल्या अत्याधुनिक वाहनाचा शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार तेंडुलकरही उपस्थित होते.                  

अग्निशामक दलाच्या पणजी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बावटा दाखवून वाहनाचा शुभारंभ केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विनय तेंडुलकर यांनी आपल्या खासदार निधीतून राज्याला दिलेल्या सुमारे २.३५ कोटी रुपयांच्या वाहनाचा अग्निशामक दलाला मोठा फायदा होणार आहे. हे वाहन प्रामुख्याने वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीसाठी वापरण्यात येणार आहे. औद्योगिक वसाहतींतील आग विझविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक उपकरणांचा या वाहनात समावेश आहे. तसेच दलाच्या जवानांच्या सुरक्षेसाठीची उपकरणेही आहेत. त्यामुळे दलाचे जवान या वाहनाचा निश्चितपणे चांगला वापर करतील.                   

लोकसभेचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनीही आपल्या खासदार निधीतून अग्निशामक दलाला याआधी अशाप्रकारची पाच वाहने दिली आहेत. त्यांचा लाभ दलाला होत आहे. कुंडई आणि म्हापसा परिसरातील औद्योगिक वसाहतींसाठी प्रत्येकी एक अशी दोन अशाच प्रकारची वाहने राज्याला हवी आहेत. ती मिळाल्यानंतर तेथील गरज पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने धारबांदोडा, सासष्टी आणि कुंकळ्ळी येथे नवी तीन अग्निशामक केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अग्निशामक दलाचे जवान गोमंतकीयांना चांगली सेवा देत असल्याचे सांगत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संपूर्ण दलाचे अभिनंदनही केले.                  

दरम्यान, अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन यांनी मुख्यमंत्र्यांना वाहनात असलेल्या सर्व सोयीसुविधांची माहिती दिली. तसेच या वाहनामुळे आगीच्या घटनांवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.