युद्धकालीन नाण्यांचा संच

नवलाईच्या शोधात

Story: डाॅ. प्रमोद पाठक | 17th August 2019, 11:22 Hrs


-
माझा नाणी गोळा करण्याचा छंद मी अमेरिकेतही जोपासला होता. तिथे जुनी नाणी गोळा करणे परवडणारे नव्हते. मी अमेरिकेतील वेगवेगळी नाणी जमविण्याचा छंद जोपासला. वेळोवेळी नवी नाणी पाडण्यात अमेरिका अग्रेसर आहे. ती प्रचारात न आलेली नवी नाणी मी गोळा करत असे. असेच एकदा गराज सेलमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान पाडण्यात आलेला काचेच्या फ्रेममध्ये व्यवस्थित बसविलेला नाण्यांचा संच विक्रीस ठेवला होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान संरक्षण उत्पादनासाठी कमतरता पडू नये, यासाठी तांबे, निकल इत्यादी नाण्यांसाठी नेहमी वापरण्यात येणारे धातू न वापरता स्टील, जस्त, गन मेटल इत्यादी मिश्र धातू वापरून नाणी पाडण्यात आली.
कधी नव्हे ते एक सेंटचे लिंकनचे नाणे स्टिलमध्ये पाडून त्यावर चकाकी येण्यासाठी जस्ताचा मुलामा देण्यात आला होता. युद्ध संपेपर्यंत ती नाणी पाडली जात होती. युद्ध संपल्यावर लगेच नेहमीप्रमाणे जुन्या धर्तीवर नाणी पाडणे सुरु झाले. युद्धकालीन नाणी संग्राहकांमध्ये जमा होऊ लागली. अमेरिका व्यापारीकरणात निष्णात आहे. तेथील केनेडी मिंट - टांकसांळीने हा संच तयार केला. त्याला व्यवस्थित लाकडी चौकटीत बसवून ते विक्रीस काढले. त्याचे कॉपीराईट पण घेतले. त्याचे वर्ष १९७४. चौकटीच्या डाव्या कोपऱ्यात ते दिले आहे.
दुसऱ्या महायुद्धात ज्या सेनानींनी सक्रीय सहभाग घेतला त्यांच्या नाण्याचा संचात युद्धकालीन इतर नाण्यांबरोबर समावेश करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान पंचतारांकित गौरव प्राप्त करणारे आणि युद्धोत्तर राष्ट्राध्यक्ष आयझेनोवर, व्दितीय महायुद्धातील कमांडर इन चिफ असलेले सेनानी रुझवेल्ट, आणि पीटी-१०९ या नौकेच्या लढाईत अतुलनीय साहस दाखवून अजरामर झालेले राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे मुखवटे असलेली नाणीही आहेत. छापलेल्या मजकुरात सर्वात वरती WARTIME COINAGE असे शीर्षक असून त्या खाली युद्धग्रस्त कुटुंबातील आई-वडील आपल्या मुलांना झोपवितानाचे छायाचित्र आहे. त्या खाली FREEDOM FROM FEAR असे छापले आहे. त्या चित्राचेही कॉपीराईट घेतलेले दिसते. कारण चित्राच्या खाली COPYRIGHT 1943, CURTIS PUBLISHING COMPANY असे अगदी बारीक अक्षरात छापले आहे. चित्राच्या बाजूनी जी नाणी आहेत त्यांची माहिती देणारा मजकूर WAR NICKEL, SHELL CENT दिला आहे. एकाच संचात कॉपीराईटची दोन वर्षे त्यातही ४३ वर्षांचे अंतर नमूद केलेले असणे, हे या संचाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे जरी कॉपीराईटचे वर्ष १९७४ होते तरी अध्यक्ष केनेडींचे नाणे अमेरिकेच्या द्विशताब्दीनिमित्ताने काढलेले आहे. त्यावर १७७६-१९७६ असे दिले आहे. १९७० च्या दशकात या संचाला चांगली मागणी असावी. त्याचा अर्थ असा की मी जेव्हा संच २००६ मध्ये विकत घेतला तेव्हा त्याला तीन दशके झाली होती.
हा संच मालक का विकतो आहे, याचे कुतूहल मला होते. त्याने उत्तर दिले की, नाणी जमविण्याचा छंद त्याच्या आजोबांना होता. त्याच्या वडिलांनी तो संग्रह विक्रीला काढला. हा शेवटी उरलेला संच तो विकतो होता. त्याला नाणी जमविण्यात रस नव्हता. त्याने सांगितलेली किंमत अव्वाच्या सव्वा नव्हती. इतर लोक तिथे होते. त्यांच्या नजरेस जर तो पडला असता तर नक्कीच त्याने सांगितलेल्या किमतीत विकत घेतला असता. मी नेहमीची थोडी घासाघीस करणे सोडून लगेच होकार दिला. अर्थातच मग तो संच माझ्या संग्रहात जमा झाला.
(लेखक पुरातन संस्कृती अभ्यासक आहेत.)

Top News

कार्यकारी संपादकपदी नेमणूक

किशोर नाईक गांवकर - गोवन वार्ता; पांडुरंग गांवकर - भांगरभूंय Read more

मडगाव अर्बनचे ‘टीजेएसबी’त विलिनीकरण अखेर निश्चित

म्हापसा अर्बनची मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक; सारस्वत बँकेकडून प्रक्रियेला गती Read more

अधिकारी तुपाशी; चालक-वाहक उपाशी

बदली चालक-वाहकांना प्रतिदिन फक्त ५०० रुपये; सुविधांपासूनही वंचित Read more

परप्रांतीय आडनावे असलेले कर्मचारी गोमंतकीयच

‘कदंब’चे महाव्यवस्थापक संजय घाटे यांचे स्पष्टीकरण Read more