कन्वेन्शन सेंटरसाठी ११०० कोटी खर्च अपेक्षित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती


31st July 2019, 02:42 am

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दोना पावला येथील नियोजित कन्वेन्शन सेंटर उभारण्यासाठी ११०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे.
आमदार रवी नाईक यांनी सरकारकडे ५ हजार लोकांना बसण्याची क्षमता असलेले कन्वेन्शन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे का, असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी दोना पावला येथे माहिती-तंत्रज्ञान खात्याकडे असलेली २०९७०६ चौरस मीटर जमीन कन्वेन्शन सेंटरसाठी निश्चित केली आहे. त्या जागेत हे सेंटर होईल. गोवा मनोरंजन सोसायटीच्या गरजेप्रमाणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासाठी लागणाऱ्या सुविधा उभारण्यासाठी कन्वेन्शन सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
या कन्वेन्शन सेंटर उभारण्यासाठी इच्छूक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी केली आहे. इच्छा प्रस्तावासाठी निविदा भरणाऱ्या व निवडल्या जाणाऱ्या पात्र कंपनीशी करार करण्यासाठी कराराचा मसुदा तयार केला आहे. सध्या तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.