चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात

31st July 2019, 02:41 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग चतुर्थीपूर्वी खड्डेमुक्त होणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम खात्यातर्फे केले जाईल. अंतर्गत रस्त्यांची डागडुजी पंचायत तथा पालिकांकडून केली जाते. खड्डे बुजविण्यासाठी खास एजन्सीची निवड करण्यात आली असून, लवकरच कामाला सुरूवात होईल, असेही ते म्हणाले.
सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस आणि कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचा तसेच मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या कामांबाबत प्रश्न विचारले. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे दरवर्षी १५ मेपर्यंत मान्सूनपूर्व कामे केली जातात, असे मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांनी सांगितले. या व्यतिरीक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत असते. त्यासाठी खास नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मान्सून काळात या समितीकडून शिफारस होणारी कामे केली जातात, असेही ते म्हणाले.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्राणहानी झाल्याची अनेक प्रकरणे आहेत. अशावेळी सरकारने आपत्कालीन अधिकारांअंतर्गत ही कामे तातडीने हाती घ्यावीत, असे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांनी सांगितले. क्लाफासियो डायस यांनी मडगाव ते केपेपर्यंतच्या रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली असून, याठिकाणी छोटे-मोठे अपघात घडत असल्याने या रस्त्याची युद्धपातळीवर डागडुजी करावी, अशी मागणी केली.

राज्यात ठिकठिकाणी मलनिस्सारण आणि भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे हाती घेणे शक्य झाले नाही आणि त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले.
- दीपक प्रभू पाऊस्कर, सार्वजनिक बांधकाममंत्री.

‘ते’ मशीन कुठे गेले? : राणे
सरकारने खड्डे बुजविण्यासाठी एक मशीन खरेदी केले होते. या मशिनचे काय झाले, असा सवाल पर्येचे आमदार प्रतापसिंग राणे यांनी केला. हे मशीन आता नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच मग नवे मशीन घ्या, अशी जोरदार मागणी राणे यांनी केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तत्काळ ही मागणी मान्य करून नवीन मशीन खरेदी करू, असे आश्वासन सभागृहाला दिले.  

Related news

माशेल, जुने गोवेत पाणी पुरवठ्याला विलंब

३-४ दिवस कळ सोसण्याची विनंती; पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न : पाऊस्कर Read more

कन्वेन्शन सेंटरसाठी ११०० कोटी खर्च अपेक्षित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती Read more

खाण व्यवसायात अडथळा आणणाऱ्यांना तडीपार करा

प्रतापसिंग राणे; खनिज महामंडळ स्थापण्याची साल्ढाणा यांची मागणी Read more