फोंडा मलनिस्सारण प्रकल्प एप्रिल २०२० पर्यंत होणार पूर्ण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा; नागरिकांनी सहकार्य करावे


31st July 2019, 02:40 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : उंडीर-फोंडा येथील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करू, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. साखळी येथील मलनिस्सारण प्रकल्पासाठीच्या जोडण्यांचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प ही गरजेची सेवा अाहे आणि स्वच्छता तथा आरोग्यासाठी ही महत्वपूर्ण ठरणार असल्याने जनतेने त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी हा प्रश्न विधानसभेत विचारला. उंडीर येथे मलनिस्सारण प्रकल्प सुरू झाला नसतानाच या प्रकल्पासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम कसे काय सुरू झाले, असा सवाल रवी नाईक यांनी केला. या प्रकल्पासाठी नेमकी किती पाईप्स आणण्यात आले आणि किती काम पूर्ण झाले, असा सवाल त्यांनी केला. उंडीर प्रकल्पासाठी सर्व परवाने आणि मंजुरी मिळाली आहे. तेथील स्थानिकांनी मात्र या प्रकल्पाला विरोध केला आहे. सरकार अन्यत्र वेगळ्या जागेची पाहणी करीत आहे, असे दीपक प्रभू पाऊस्कर यांनी सांगितले.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मडगावातील मलनिस्सारण सेवेचा विषय उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे काम पूर्ण झाले आहे. नावेली येथे एका मॅनहोलमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्यामुळे पुढील काम अडले आहे, असे सांगितले. रोहन खवंटे यांनी देखील पर्वरीतील मलनिस्सारणाचा विषय उपस्थित केला. प्रकल्पासाठी तीन ठिकाणच्या जागांचा प्रस्ताव दिला आहे; परंतु त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. लुईझिन फालेरो यांनी नावेली मतदारसंघातील नादुरूस्त पाईप्सचा विषय उपस्थित केला. राज्यातील सर्व मलनिस्सारणाची कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिले. मलनिस्सारण ही गरजेची सेवा असून हा मळ नदी, नाल्यात गेल्यास त्यातून रोगराई पसरू शकते आणि प्रदूषणाचा धोका असतो, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.


मुख्यमंत्री म्हणाले...
- उंडीरच्या मलनिस्सारण प्रकल्पाला सर्व परवाने मिळाले आहेत.
- स्थानिकांनी हा विषय समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे.
- या प्रकल्पासाठी एकूण ५३६ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
- हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करू.