‘सांस्कृतिक पर्यटन’ संकल्पना साकारण्याची गरज : मुख्यमंत्री

गोवा कला अकादमीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ; ‘पूर्वरंग’मधून गोमंतकीय लोककलांचा आविष्कार


16th July 2019, 03:28 am
‘सांस्कृतिक पर्यटन’ संकल्पना साकारण्याची गरज : मुख्यमंत्री


वार्ताहर । गोवन वार्ता
पणजी :
कलाकारांची खाण असलेल्या या गोव्याच्या भूमीत नवनवे कलाकार घडावेत, असे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे स्वप्न होते. कलाकारांना प्रेरणा देणारी ही संस्था त्यांनी दूरदृष्टीने निर्माण केली, ती गोव्याची वेगळी आेळख आहे. गोवा हे आज कलेला महत्त्व देणारे राज्य आहे. गोव्यात आता सांस्कृतिक पर्यटन ही संकल्पना साकार होण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी येथे व्यक्त केले.
गोवा कला अकादमीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. त्यांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी वर्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कला व संस्कृती मंत्री तथा अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे, कला संस्कृती खात्याचे सचिव चोखाराम गर्ग, कला अकादमीचे सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर, प्रशासकीय संचालक प्रवीण बरड उपस्थित होते.
गोविंद गावडे म्हणाले, भाऊसाहेब बांदोडकर यांच्याकडे दूरदृष्टी होती. भाऊंनी कला अकादमीचे रोपटे लावले, त्याचा वटवृक्ष झाला आणि त्याच्या छायेत कितीतरी कलाकार घडले आहेत. कला अकादमीचे नाव आज जगावर पोचले आहे.
यानिमित्ताने ‘पूर्वरंग’ हा समृद्ध गोमंतकीय लोककलांचा आविष्कार घडविणारा शानदार कार्यक्रम सादर झाला. हेमू गावडे व साथींनी घोडेमोडणी, गोफ, जागर सादर केला. अविनाश गावडे व साथींनी वीरभद्र, मुसळनृत्य, समईनृत्य, तर दिव्या नाईक व साथींनी हळदीगीतां, आेव्या, धालो व दिंडी सादर केली. शुभदा च्यारी व साथींनी दवळी मांड, तर दत्ताराम सावंत व साथींनी मोरूलो सादर केले ट्विंकल माईणकर व साथींनी फुगडी, काॅज्मा फर्नांडिस व साथींनी धुलपदां व मांडो, तर शुभदा नाईक व साथींनी समूहवादन असा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार घडवून रसिकांची उत्स्फूर्त दाद घेतली.
कला अकादमीच्या ५० वर्षांच्या कलात्मक प्रवासाचा धावता आढावा ‘कला तरंग’ या सादरीकरणातून घेण्यात आला. त्यांची संकल्पना व संहिता लेखन डाॅ. प्रकाश वजरीकर व डाॅ. पूर्णानंद च्यारी यांचे होते. कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन डाॅ. रूपा च्यारी व डाॅ. पूर्णानंद च्यारी यांनी केले.
प्रसिद्ध रंगकर्मी डाॅ. अजय वैद्य यांनी मनोहरराय सरदेसाई व अॅड उदय भेंब्रे यांच्या कवितांचे अभिवाचन करताना चित्रकार शिवाजी शेट यांनी त्यावर चित्राविष्कार घडविला व त्याला सुकांती नाईक हिने सतारवादनाची जोड दिली.

गोविंद गावडे यांच्याबरोबर नाटक करायला आवडेल : मुख्यमंत्री
मी हाैशी रंगभूमीवर शिमग्याच्या, काल्यांच्या नाटकातून भूमिका करायचो; परंतु कला अकादमीच्या नाट्य स्पर्धेत काम करेन, असे वाटले नव्हते. मात्र ही संधी २००६ मध्ये मिळाली. माझ्या पत्नीसमवेत मी ‘प्रश्नाला उत्तरं दोन’ या नाटकात भूमिका बजावली. त्यानंतर नाटक केले नाही. गोविंद गावडे आजही भूमिका वठवत आहेत. त्यांच्या बरोबर काम करायला मला आवडेल, असे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत म्हणाले.