क्षणभंगूर सत्तेची व्यथा


16th July 2019, 02:27 am
क्षणभंगूर सत्तेची व्यथा

सत्ता ही क्षणभंगूर असते. ती कधी येते आणि कधी जाते हेच कळत नाही. कधीकधी सत्ता ही आपली कायमस्वरूपी सहचारिणी असल्याच्या आभासात वावरणारे लोक सत्ता गमावल्यानंतर विरहाने व्याकुळ बनतात. सत्ता गेल्यानंतर ‘जलाविना मासे’ अशीच जणू त्यांची अवस्था होते. हे लोक मग मिळेल ती संधी घेतात आणि रातोरात उड्या टाकून आपनी निष्ठा धुळीला मिळवतात. जनतेने आपल्याला निवडून दिले आहे आणि ती जनता काय विचार करणार ही कल्पनाही त्यांना शिवत नाही. कारण त्यांनी निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची बेगमी केलेली असते आणि त्यासाठी काही ठराविक मतदारांचा खर्च नियमित पद्धतीने केला जातो. मग जनता तरी अशा माकड उड्यांचा कोणत्या नैतिकतेतून निषेध करणार?
यापूर्वी पक्षांतरांमुळे बदनाम झालेला गोवा आता अधिकृत आणि कायदेशीर पक्षांतरामुळे चर्चेला आला आहे. मगोचे दोन आणि आता काँग्रेसचे दहा आमदार दोन तृतीयांश बहुमताच्या जोरावर थेट भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी मुख्य घटकांना मंत्रिपदे तर इतरांना महामंडळे देण्याचे ठरले आहे. दोन तृतीयांश फुट पडल्यास फेरनिवडणुकीला सामोरे जाण्याची गरज नाही. बाबू आणि दीपक यांनी पहिला धक्का दिला, त्यावेळीच पुन्हा दुसरा धक्का बसेल, असा अंदाज वर्तवला जात होता. विजय सरदेसाई यांच्यावर सुदिन ढवळीकरांसारखी परिस्थिती उद्भवणार, अशी चर्चा होती; पण विजयचे दोन्ही आमदार ठाम राहिल्यामुळेच हा बेत फसला. हा बेत फसला खरा; पण दुसरा मोठा डाव म्हणजे ‘राजकीय सर्जिकल स्ट्राईक’च ठरला. काँग्रेसचे दहा आमदार भाजपात दाखल झाले. तिघांना मंत्रिपदाची भेट मिळाली. मायकलबाबचे घोडे ह्यात गोंधळात अखेर न्हाले. गोवा फॉरवर्डचे तीन आणि रोहन खंवटे यांचे मंत्रिपद मात्र या सर्जिकल स्ट्राईकचे बळी ठरले. बिचारे आज विरोधी लॉबीतून सभागृहात आले. चेहऱ्यावर अपमानास्पदाची भावना सारे काही बोलून जात होती. विनोद पालयेकर, जयेश साळगावकर यांची तर शेवटच्या खुर्चीवर सोय केलेली.
सोमवारी सकाळी सभागृहात पोहचताच मंत्री आपली आसनव्यवस्था तपासण्यात गर्क होते. इकडचे-तिकडे आणि तिकडचे-इकडे अशीच परिस्थिती झालेली. सभागृहाचे कामकाज सुरू झाले; पण विरोधी नेत्याची खुर्ची मात्र रिकामीच होती. काही वेळानंतर खाशेंचे आगमन झाले आणि ते थेट विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्चीवर आसनस्थ झाले. त्यावरून हे पद खाशांकडेच जाणार हे निश्चित झाले. एकमेकांशी हस्तांदोलन, गळाभेटी सुरूच होत्या. मायकलबाबांनी चक्क मंत्रिपदाच्या खुर्चीला प्रणाम केला आणि ते आसनस्थ झाले. त्यांनी आपल्या केबिनमध्ये चक्क पुरोहितामार्फत पूजा करून ताबा घेतला. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर मॉविन गुदिन्हो यांच्यानंतर बाबूश माॅन्सेरात आणि मायकल लोबो यांनी पंचारती हातात घेतलेली पाहिल्यानंतर त्यांचे खरोखरच परिवर्तन झाल्याचे दिसले. जेनिफर मॅडम बऱ्याच आनंदात दिसत होत्या. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, म्हणून जेनिफरला मंत्रिपद दिले, असे बाबूश माॅन्सेरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
सरकार कुणाचेही असो. नेहमीच सत्तेचे वाटेकरी बनलेले सुदिनपंत यावेळी मात्र चक्क विरोधी बाकांवर बसले आहेत. राजकारणाचा आणि त्यात मंत्रिपद आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव. सोमवारी विधानसभेत सुदिनपंतच जणू विरोधी पक्षनेत्यासारखे बोलताना दिसत होते. निविदांच्या काही तांत्रिक अटींसंबंधी मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांना अडकवण्याचा प्रयत्न करीत होते; पण डॉक्टर महाशय अजिबात बधले नाहीत. सुदिनपंत विरोधात असले तरी सरकारला पाठिंबा दिल्याचे पत्र मात्र त्यांनी अद्याप मागे घेतले नाही. रोहनबाब यांनीही आपला पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र राज्यपालांना दिलेले नाही. दुपारी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना सुदिनपंत राजकीय पक्षांतरावर बोलले, तोच बाबू उठले. पक्षांतराला सुदिनराव जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. ही खडाजंगी काही काळ चालली. गोविंदराव मुकाटपणे हे पाहत होते बरं का. अखेर डॉक्टरांनी बाबूंना शांत केले. विजय, विनोद, जयेश, रोहन अबोल होते, पण अबोल राहून कसे चालेल. काहीतरी बोलावे लागेलच की. अहो जनतेने निवडून दिले ते अबोल राहण्यासाठी थोडेच. आता जनतेला कुणीच वाली राहिलेला नाही. या जनतेचा आवाज बनण्याची नामी संधी त्यांना मिळालेली आहे. क्षणभूंगूर सत्तेची आस सोडून पुन्हा एकदा जनतेचा ध्यास घेतला, तर त्याचा भविष्यात निश्चितच उपयोग होणार हे मात्र नक्की.