वीज एक रुपया युनिट करण्याचा प्रयत्न : काब्राल


16th July 2019, 05:46 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : राज्यातील सुमारे १.७२ लाख ग्राहक शंभर युनिटखालील वीज बिले भरतात. त्यांच्याकडून १.४० रुपये प्रती युनिट दर आकारला जातो. हा दर प्रती युनिट १ रुपया करण्याचा प्रयत्न आपण करीत आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.      

राज्य सरकार वेळोवेळी सर्वसामान्य गोमंतकीयांना मदतीचा हात देत आहे. त्याचाच भाग म्हणून शंभर युनिटखालील बिले भरणाऱ्या सुमारे १.७१ लाख कुटुंबांना मदत करण्याचे सरकारने ठरविले आहे. प्रती युनिट १ रुपया दर करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हा निर्णय घेऊन सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे मंत्री काब्राल म्हणाले.       

गोमंतकीयांना २४ तास वीज देणे सद्यपरिस्थितीत शक्य नाही. पावसाळ्यात अनेक ठिकाणची झाडे वीज वाहिन्यांवर कोसळतात. या वाहिन्या दुरुस्त करताना वीज खात्यातील अनेक कर्मचारी जखमी होत आहेत. झाडांवर अडकलेल्या वीज वाहिन्या काढताना काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे भूमिगत वीजवाहिन्यांसाठी आपण प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले. 

भूमिगत वीज वाहिन्यांसंदर्भातही आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, मुख्यमंत्र्यांनीही त्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. भूमिगत वीज वाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर राज्याला २४ तास वीज देणे शक्य होईल. पण ही प्रक्रिया पूर्ण होण्यास पुढील तीन-चार वर्षे लागतील, असेही मंत्री काब्राल यांनी स्पष्ट केले.