पाठिंबा मागे, विरोधात बसणार : सरदेसाई

गोवा फॉरवर्डसह अपक्ष खंवटेंचा एल्गार; पर्रीकरांची विचारधारा संपवल्याची टीका


14th July 2019, 06:26 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आम्हाला मंत्रिमंडळातून वगळून आमच्यासह माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचाही विश्वासघात केला आहे. त्यामुळे पर्रीकरांचा राजकीय मृत्यू झाल्याचा आरोप करीत, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदार रोहन खंवटे सरकारचा पाठिंबा काढून घेऊन विरोधात बसेल, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

शनिवारी मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर मनाहेर पर्रीकर यांच्या मिरामार येथील समाधीस्थळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मुख्यमंत्र्यांनी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डला वगळल्याने आम्हाला काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याशी संपर्क साधणे बंद केले आहे. पण आम्ही अजिबात घाबरलेलो नाही. किंबहुना मंत्रिपदे गेल्याचे दु:खही आम्हाला नाही. मंत्री म्हणून काम करीत असताना आम्ही चौघांनीही गोंयकारपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. यापुढेही विरोधात बसून आम्ही गोंयकारपणासाठीच लढू, असे सरदेसाई यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह भाजपच्या विद्यमान नेत्यांनी या पक्षाची विचारधाराच संपविण्याचा विडा उचलला आहे. मनोहर पर्रीकर यांचा वारसा नष्ट करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. गोंयकारपणाचा गंधही नसलेले सरकार यापुढे राज्याचा गाडा हाकणार आहे. पण आम्ही त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही. विरोधात बसून सरकारवर लक्ष ठेवू, असा इशाराही सरदेसाई यांनी दिला.

हेही वाचा