मंत्रिपदांच्या दुरुपयोगामुळेच गोवा फॉरवर्ड, खंवटेंना वगळले : लोबो

पर्रीकरांच्या समाधीस्थळाचा गैरवापर केल्याचीही टीका


14th July 2019, 06:16 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता            

पणजी : मंत्रिपदांचा गैरवापर केल्याने तसेच गोंयकारपणाच्या नावाखाली जनतेला फसविल्यामुळेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा फॉरवर्डच्या तीन मंत्र्यांसह अपक्ष रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळातून वगळले, अशी टीका नवनिर्वाचित मंत्री मायकल लोबो यांनी शनिवारी केली.      

राजभवनातील शपथविधी सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळातून बाजूला केल्यानंतर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा अंत्यसंस्कार केलेल्या जागेत पत्रकार परिषद घेऊन विजय सरदेसाई यांनी आपली उरलीसुरली लाजही घालविली आहे. सरदेसाई यांच्या या कृत्यामुळे जनतेत संताप पसरला आहे, असे लोबो म्हणाले.       

विजय सरदेसाई आम्हाला अगोदर चांगले व्यक्ती वाटत होते. पण गोंयकारपणाच्या नावाखाली जनतेला फसविण्याचा त्यांचा अजेंडा उशिराने आमच्या लक्षात आला. गेल्या अडीच वर्षांच्या काळात मंत्रिपदाचा वापर करून विजय यांनी गोमंतकीय जनतेची वारंवार फसवणूक केली आहे. त्यामुळेच सोशल मीडियाद्वारे अनेकजण त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. विजय यांनी चांगले काम केले असते, तर लोक त्यांच्यावर भडकले नसते. शिवाय मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळलेही नसते, असे ते म्हणाले.      

गोवा आणि गोंयकारपणाच्या नावाखाली मते मिळवून विजय सरदेसाई मंत्री झाले. पण आपल्यासाठी विश्वासाने काम केलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले. त्याचा फटका पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना निश्चित बसेल, अशी टीका त्यांनी केली. विजय सरदेसाई आता आमचा ‘वॉचडॉग’ बनण्याची धमकी आम्हाला देत आहेत. पण त्यांची ही दादागिरीची भाषा यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही मायकल लोबो यांनी दिला.

वगळण्याच्या कारणांचा शोध घ्या !

विजय सरदेसाई माझे चांगले मित्र आहेत. पण मंत्रिपदे काढून घेतल्यामुळे ते चिडले आहेत. अपक्ष असलेल्या गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळात ठेवले जाते आणि आपल्याला मात्र वगळले जाते, याची कारणे विजय सरदेसाई यांनी शोधावी, असे आवाहनही मंत्री मायकल लोबो यांनी केले.