बहिरेपणाचे निदान -

मंत्र आरोग्याचा

Story: डाॅ. भिकाजी घाणेकर |
13th July 2019, 11:51 am
बहिरेपणाचे निदान -


अनेकांना बहिरेपणा येतो. अर्थात त्यामागे काही कारणे आहेत. माणसाला एेकू येत नाही, हे आधीच समजले तर त्यावर त्वरित उपाय करता येतात. इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी तेल अविव शहरात ११ व्यक्तींवर संशोधन करून बहिरेपणाचे लवकर निदान करणारे यंत्र तयार केले आहे. शेकडो जिन्स मांडून त्यापासून येणाऱ्या आवाजावरून हे बहिरेपणाचे निदान करतात. त्याला ‘डीप सिक्रेसिंग’ म्हणतात.
संशोधनासाठी ज्यांच्यावर प्रयोग केला त्या व्यक्ती एकमेकांच्या नातेवाईक नव्हत्या. त्यामुळे बहिरेपणा हा अनुवांशिकतेने येण्याची शक्यता नव्हती. येथील लोकांना घेऊन केलेले हे पहिलेच संशोधन होते.
मेंदू आणि कान यांच्या मधील संबंधांना अडथळा आला तर बहिरेपणा येतो. गोंगाट असलेले वातावरण, रस्त्यावरील मोटारी, दुचाक्या, आगगाडी, विमान, कारखाना यांच्या आवाजाचा परिणाम होऊन बहिरेपणा येतो. फटाक्यांच्या आवाजानेही तो येऊ शकतो. ते पटकन लक्षातही येत नाही. त्यामुळे एेकण्याच्या क्षमतेवर जराही परिणाम झाला, तरी डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
मोठा आवाज होतो, अशा कारखान्यांमध्ये काम केल्यानेही बहिरेपणा येऊ शकतो. प्रिटिंग प्रेससारख्या ठिकाणी प्रचंड आवाज होतो. तेथे काम करणाऱ्यांची एेकण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे पुढे या कामगारांना घेऊन संशोधन करण्याचे इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी ठरविले आहे.
अलीकडच्या काळात जिन्सवर संशोधन करून आजार शोधून काढले जातात. अनुवांशिकतेने कोणता आजार होऊ शकतो, त्याचीही शक्यता तपासून पाहतात. बहिरेपणावर अजून संशोधन चालू आहे. इस्रायली शास्त्रज्ञांनी केलेले निदान, अभ्यास व बहिरेपणा आधीच शोधून काढण्यासाठी तयार केलेले यंत्र याचा इतरांना संशोधनासाठी फायदा होऊ शकतो. अनुवांशिकतेने बहिरेपण येते, त्यावरही संशोधन करून ते दूर करण्यात शास्त्रज्ञांना यश येऊ शकते.
(लेखक निवृत्त आरोग्य संचालक आहेत.)