आणि जखमी रानडुकराने....

मुलांचे पान

Story: शीतल सावंत |
13th July 2019, 11:50 am


............
लहानपणाच्या गोष्टी सहसा आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून लुप्त होत नाहीत. त्या चिरंजीव बनून सतत आपल्या आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत साथ देतात. अशीच एक अविस्मरणीय, प्रत्येक वेळी आठवताना अंगावर काटा आणणारी गोष्ट.
उन्हाळ्याचे दिवस होते. एप्रिल, मे महिन्यांत गावाकडील लोकांना एकच ध्यास असतो तो म्हणजे काजूच्या पिकाचा. गोव्यात या महिन्यांमध्ये काजूच्या पिकाला बहर आलेला असतो. लहान मुलांना तर काजूबागायतीत जाऊन काजू गाेळा करण्यास मज्जाच वाटते. मी त्यावेळी पाच व माझा मोठा भाऊ आठ एक वर्षांचा असेल. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही बाबांबरोबर आमच्या डोंगरमाथ्यावरील काजू बागायतीत जायचो. आमची काजूची झाडे वाघेरी डोंगराच्या जवळ म्हणजे १५ ते २० किमी. दूर असतील. त्यामुळे रानटी प्राण्यांचा संचार हमखास असायचा. त्यांचे दर्शन आम्हाला अधूनमधून पहायला मिळे.
काजू गोळा करण्यासाठी आम्ही सकाळी जात असू. संध्याकाळी सर्व कामे म्हणजे काजू गोळा करणे ते पिळणे व पायांनी मळून त्यांचा रस काढण्याची कामे करून घरी यायचो. आम्ही जाताना दुपारचे जेवणही सोबत घेऊन जात असू. असे डोंगर माथ्यावर, चोहोबाजूंचा निसर्ग न्याहाळताना वनभोजन म्हणा किंवा सहभोजन करण्याची मज्जाच निराळी.
असेच एक दिवस आम्ही डोंगरमाथा चढून बाबांबरोबर ‘काजूच्या झाडांनी’ गेलो. आता काजूच्या पिकांचा हंगाम संपत आला होता, त्यामुळे आम्ही आता पडलेले काजू न वेचता झाडावर चढून किंवा काठीने काजू काढायला सुरुवात केलेली. खूप झाडे असल्याकारणाने आम्ही दिवसाला १० ते २० काजूच्या झाडांचेच काजू काढत असू.
बाबांनी लांब काठी घेतली व काजू काढू लागले. मी व माझा भाऊ खाली पडणारे काजू गोळा करू लागलो. बाबा थोड्या वेळाने झाडावर चढून काजू काढू लागले. आम्ही काजू गोळा करण्यासाठी छोट्या- छोट्या आम्हाला झेपतील, अशा बादल्या घेतल्या होत्या. माझी बादली लहान असल्याकारणाने ती लवकर भरली. दुसरी बादली आणण्यासाठी म्हणून मी जरा खाली गेले.
इकडे भाऊ काजू गोळा करण्यात व बाबा ते काढण्यात व्यस्त होते. एवढ्यात डोंगर माथ्यावरून हूकऽ हुक करत एक जखमी रानडुक्कर भावाच्या दिशेने धावत येऊ लागला. भाऊ रानडुक्कराला पाहून घाबरला आणि मोठ्याने ‘बाबा..बाबा..’ असे ओरडू लागला. बाबा उंच झाडावर असल्याकारणाने लवकर खाली उतरू शकत नव्हते. भावाला पळण्याचाही अवसर न देता त्या रानडुक्कराने त्याला खाली पाडले. उतरती असल्याकारणाने भाऊ गटांगळ्या खात खाली माझ्या बाजूने आला. मी भावाला सावरण्याचा प्रयत्न केला. भावाला अशा स्थितीत पाहून मी किंकाळी मारली. तो रानडुक्कर वरच होता. तो आमच्या दिशेने येऊ लागला. बाबा मोठ्याने आरडाओरडा करत ‘कोणी वाचवा रे माझ्या मुलांना’ म्हणत टाहो फोडू लागले. आम्हा दोघांना काय करावे तेच कळेना. झाडावर चढायलाही येत नव्हते की पळून जाण्याचाही मार्ग नव्हता. त्यात भावाच्या नाका-तोंडातून रक्त वाहत होते.
रानडुक्कर धावत आमच्या दिशेने येऊ लागला. आमच्याकडे पोचतो न पोचता एवढ्यात कोठून तरी ठो... असा बंदुकीचा आवाज आम्हाला ऐकू आला. आवाज एवढा मोठ्ठा होता की तो रानडुक्कर घाबरून आम्हाला सोडून आल्या पावली पळून गेला.
खरं तर कोणा शिकाऱ्याने प्राण्याची शिकारीसाठी जवळच डोंगरमाथ्यावर बंदुकीने गोळी झाडली होती. या जखमी रानडुकराला वाटले कोणीतरी त्याच्यावरच गोळी झाडली आहे व आपले प्राण वाचवण्यासाठी त्याने धूम ठोकली. कदाचित तो गोळीनेच जखमी झाला असावा.
खरं तर त्या दिवशी आम्हाला वनदेवतेनेच वाचवलेले होते. जर ऐनवेळी त्या शिकाऱ्याने हवेत गोळी झाडली नसती तर त्या पिसाटलेल्या रानडुकराने आम्हा भावंडाची काय दशा केली असती, देवच जाणे. रानडुकराने पळ काढल्यावर बाबा आमच्याकडे धावत आले. आम्ही तर तोपर्यंत आमच्या जागेवरून हललोच नाही. खाली आपापल्या बागायतीत असलेले लोक धावत वर आले. भाऊच्या नाका तोंडाला खरचटले होते. भीतीने तर तो अक्षरश: कापत होता. त्याला तातडीने डॉक्टरकडे नेले.
पुढचे कित्येक दिवस आम्ही दोन्ही भावंडांनी भीतीनेच काढले. मी तर कित्येक रात्री स्वप्नातसुद्धा हुंदके देत रडत होते, अशी माझ्या आई मला आज सांगते. खरंच अंगावर काटा आणणारी ही घटना मी कधीच विसरू शकत नाही.
- शीतल सावंत, मये