दिग्दर्शक हॅरी फर्नांडिस

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
13th July 2019, 11:50 am
दिग्दर्शक हॅरी फर्नांडिस


---------------------
हॅरी फर्नांडिस यांनी भोजपुरी, हिंदी, मराठी व कोकणी चित्रपटात दिग्दर्शन करून नाव कमावले आहे. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९६१ रोजी मुंबईत झाला. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड. त्यांनी शाळेत असताना चार्ली चॅप्लिन, मोगेंबो खूश हुअा, आम्ही शाळेत जाणार नाही, अशा अनेक मराठी एकांकिकांमध्ये काम केला.
सिनेअभिनेते गोविंदा हे त्यांचे बालपणीचे मित्र. त्यांनी हॅरी यांची कला पाहिली होती. तरुणपणी चित्रपटात जाण्याचा सल्ला दिला. ‘साजन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक लाॅरेन्स डिसोझा यांच्याशी ओळख करून दिली. ते व हॅरी हे दोघेही मूळ मंगलोरचे. त्यांनी हॅरी यांना सहायक कॅमेरामन म्हणून संधी दिली. सुमारे आठ वर्षे त्यांनी न्याय- अन्याय, प्रतिक्षा वगैरे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण केले. नंतर लाॅरेन्स यांच्यामुळे हॅरी यांची ओळख अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी झाली. त्यांचे बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांना सहायक दिग्दर्शक हवा होताच. हॅरी यांनी नंतर शेम टू शेम, एक फूल चार हाफ, मध्यमवर्ग असे अनेक मराठी चित्रपट केले.
जिमी शेरगील यांच्या ‘जहाँ तू ले चलो’ या चित्रपटाच्या ‘ट्रायल शो’ साठी निर्मात्यांनी हॅरी यांना बोलावले होते. चित्रपटात काही चुका असल्यास सांगा असे त्यांनी हॅरी यांना सांगितले. त्यांनी दाखविलेल्या चुका पाहून ते खूश झाले व त्यांनी ‘अनजाने - द अननोन’ हा चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला. त्यात मनिषा कोईराला व संजय कपूर होते. एक बिहारी एनआरआय दिग्दर्शक शोधत होता. तेव्हा लाॅरेन्स यांनी हॅरीचे नाव सुचविले. चित्रपट होता, भोजपुरी भैय्या. नंतर हॅरी यांनी गोला बारूद, भूमिपुत्र, आज के करण अर्जुन, गंगा जमुना सरस्वती हे भोजपुरी चित्रपट केले.
हॅरी यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमात झाले आहे. त्यांनी ‘सुपरस्टार नंबर १’ हा व्हिडिओ तयार केला असून त्याची अमिताभ बच्चन यांनी स्तुती केली होती. त्यांंनी ‘नशिबाचो खेळ’, ‘सोफिया- द ड्रीमगर्ल’, ‘जावंय नंबर वन’ हे कोकणी चित्रपट दिग्दर्शित केले असून ‘सोफिया’ ला दिग्दर्शनासाठी कर्नाटक राज्य पुरस्कार मिळाला आहे. मंगलोरच्या ‘कलांगण’तर्फे त्यांचा गौरव करण्यात आला आहे. ‘भूमिपुत्र’ साठी त्यांना संवाद लेखनाचा पुरस्कार मिळाला आहे.
लवकर हॅरी यांचा ‘बँडकार’ हा कोकणी चित्रपट येत आहे. ते मालाड- मुंबई येथे राहतात. त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा.
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)