महान कवीचे साहित्य

वाचु आनंदे

Story: सखाराम शेणवी बोरकर |
13th July 2019, 11:49 am
महान कवीचे साहित्य


-
जगप्रसिद्ध साहित्यिक खलिल जिब्रान यांच्या निवडक साहित्याच्या कोकणी अनुवादाचे पुस्तक अलीकडेच आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक नागेश करमली यांनी हा अनुवाद केला आहे. याआधी १९७३ साली खलिल जिब्रान कोकणीत आणला होता, तो कवी बा. भ. बोरकर यांनी. त्यांनी ‘द प्रोफेट’ चे ‘पैगंबर’ नावाने सुंदर भाषांतर केले होते.
जिब्रान १९२३ मध्ये आलेल्या ‘द प्रोफेट’ या पुस्तकाद्वारे जगभर प्रसिद्ध झाले होते. या पुस्तकाचे १२० पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. जिब्रान हे सर्वाधिक खपाचे जगातील पहिल्या तीन कवींपैकी एक. १९३१ मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी या महान कवीला मरण आले. विशेष म्हणजे मरणानंतर त्यांच्या साहित्यकृती जास्त गाजल्या. लेबनन देशातील या महान कवी, तत्त्वज्ञ, चित्रकाराचे अजूनही चाहते आहेत. जिब्रान यांनी अरबी साहित्याला एक वेगळा आयाम दिला. त्यांना आशिया खंडातील साहित्य, कला, संस्कृतीचे उद्गाते मानले जाते.
नागेश करमली यांनी या पुस्तकाच्या मनोगतात ‘आपण व जिब्रान यांचे साहित्य’ याविषयी सविस्तर लिहिले आहे. गोवा मुक्ती संग्रामात असताना रेईशमागूश येथील तुरुंगात करमली यांना ठेवले होते. तेथे त्यांच्या हातात पहिल्यांदा जिब्रान यांच्या साहित्याचे पुस्तक पडले. तो मराठी अनुवाद होता. श्रीपाद जोशी यांनी जिब्रानची ‘सलमा’ ही नवलिका मराठीत आणली होती. नंतर जोशी यांनीच अनुवादित केलेल्या जिब्रानच्या नीती कथा करमली यांनी वाचल्या. ते जिब्रानच्या साहित्याच्या प्रेमातच पडले. त्यांचे संपूर्ण साहित्य त्यांनी वाचून काढले. हे साहित्य कोकणी वाचकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, असे वाटल्याने त्यांनी त्याचा कोकणी अनुवाद करायचे ठरविले. पण बऱ्याच दिवसानंतर संधी मिळाली आणि अशारितीने हा अनुवाद वाचकांंपर्यंत पुस्तकरूपाने पोहोचला.
करमली यांनी अनुवादित केलेल्या जिब्रानच्या काही कविता, नीती कथा ‘सुनापरान्त’ या दैनिकात दर रविवारी प्रसिद्ध व्हायच्या. भूंयदेव (The Earth Gods), वज्रां आनी मोतयां (Sand and Foam), अग्रदूत (Forerunner), जिब्रानाच्या दिश्टव्या काणयो (दोन भाग) (The wonderer and the madman) हे अनुवाद या पुस्तकात आहेत.
नागेश करमली मुळात कवी असल्याकारणाने त्यांना जिब्रान यांच्या कवितांचा अनुवाद चांगला जमला आहे. कारण मुळात जिब्रानचे साहित्य अनुवादित करणे तसे सोपे नाही. भाषा ओघवती, लालित्यपूर्ण व सर्वांना समजेल अशी आहे. मूळ आशयाला, शैलीला कुठेही धक्का न लावता केलेला हा कोकणी अनुवाद अतिशय उत्तम झाला आहे. विशेष म्हणजे श्री. करमली यांनी हा अनुवाद केला असे वाटतच नाही, इतका तो हुबेहुब झाला आहे. दुसऱ्या भाषांमधून कोकणीत अनुवाद करणाऱ्या भाषांतरकारांसाठी हा अनुवाद आदर्श असाच म्हणावा लागेल.
श्री. करमली यांच्या या ‘खलिल जिब्रान : वेंचीक साहित्य’ अनुवादात कोकणीतील अनेक दुर्मीळ शब्द, वाक्प्रचार वाचायला मिळतात. वयाच्या सरत्या काळात त्यांनी हा अनुवाद केला आहे, हे विशेष म्हणावे लागेल. हा अनुवाद करून ‘वय हा केवळ एक आकडा आहे’, हे सतत कार्यमग्न असणाऱ्या नागेश करमली यांनी साहित्य विश्वाला दाखवून दिले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठही सुंदर झाले आहे.
(लेखक साहित्यिक आहेत.)
----
खलील जिब्रान (वेंचीक साहित्य)
अनुवाद : नागेश करमली
प्रकाशक : संजना प्रकाशन, सांगे
पाने : १७२, किंमत : २०० रुपये