चौघांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार; तरीही फाईल्सची हाताळणी सुरूच

विजय, रोहन, जयेश, विनोद यांनी मंत्रालयात मात्र येणे टाळले

12th July 2019, 03:42 Hrs


विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई, महसूलमंत्री रोहन खंवटे, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी गुरुवारी मंत्रालयात येण्याचे टाळले; पण या सर्वांच्या खात्यातील फाईल्सची हाताळणी नेहमीप्रमाणेच सुरू होती. १० काँग्रेस आमदारांनी वेगळा गट तयार करून तो भाजपमध्ये विलीन केल्यानंतर या चार मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
बुधवारी राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर अद्याप मुख्यमंत्र्यांकडून फाईल हाताळणी स्थगित करण्याची सूचना आलेली नाही. त्यामुळे बुधवार व गुरुवार असे दोन्ही दिवस विद्यमान मंत्र्यांनी आपले खात्यांचे कामकाज सुरूच ठेवले होते. डच्चू मिळण्याची शक्यता असलेल्या चारही मंत्र्यांनी गुरुवारी मंत्रालयात येण्याचे टाळले; पण आवश्यक व महत्त्वाच्या फाईल्स हातावेगळ्या करण्याचे निर्देश त्यांनी आपापल्या खाते प्रमुखांना दिले होते.
रोहन खंवटे यांच्याकडे महसूल, माहिती तंत्रज्ञान, कामगार अशी खाती आहेत. त्यांनी बुधवारी सक्रियपणे काम केले; पण गुरुवारी ते मंत्रालयात आले नाहीत. विजय सरदेसाई यांनी बुधवारी नियोजन मंडळाची बैठक घेतली, त्यावेळी अनेक महत्त्वाच्या फाईल्सही त्यांनी हातावेगळ्या केल्या. गुरुवारी त्यांनी मंत्रालयात येण्याचे टाळले; ते मडगावमध्येच होते.
जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर हे बुधवारी मंत्रालयात होते. त्यांनी विजय सरदेसाई यांच्यासोबत चर्चाही केली. काही किरकोळ फाईल्स त्यांनी हाताळल्या.
दरम्यान, या चारही मंत्र्यांच्या खात्यातील फाईल्सची हाताळणी नेहमीसारखीच सुरू होती. कुठल्याच प्रकारचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले नव्हते. त्यामुळे फाईल्स हाताळणी स्थगित ठेवली नाही, असे सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

...म्हणून मंत्रालयात गेलेच नाहीत
आपल्याला मंत्रिमंडळातून वगळण्यात येईल, याची कुणकुण लागल्यामुळे या चारही मंत्र्यांनी आपल्या खासगी कार्यालय व घरातून काही कामकाज केले. गुरुवारीच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल, या शक्यतेमुळे ते मंत्रालयात गेलेच नाहीत.                   

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

वीज बिले आता डेबिट, क्रेडीट कार्डद्वारे

१ ऑगस्टपासून सक्ती; वीजमंत्र्यांच्या हस्ते सुविधेचा शुभारंभ; चेक, डीडीला फाटा Read more

Top News

मंत्रिपदांच्या दुरुपयोगामुळेच गोवा फॉरवर्ड, खंवटेंना वगळले : लोबो

पर्रीकरांच्या समाधीस्थळाचा गैरवापर केल्याचीही टीका Read more

पाठिंबा मागे, विरोधात बसणार : सरदेसाई

गोवा फॉरवर्डसह अपक्ष खंवटेंचा एल्गार; पर्रीकरांची विचारधारा संपवल्याची टीका Read more

चुकीच्या पद्धतीने कर आकारल्याचा कॅसिनो कंपन्यांचा दावा

जीएसटी मंडळासमोर कंपन्यांचे गाऱ्हाणे; पुढील बैठकीत अंतिम निर्णय Read more