बाबू, बाबूश, नेरी यांचे ४२५ प्रश्न होतील रद्द

मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता; तिघांव्यतिरिक्त अन्य सात ७ जणांचे प्रश्न येणार


12th July 2019, 02:41 am


विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बाबू कवळेकर, फिलीप नेरी रॉड्रिग्स व बाबूश मोन्सेरात यांची मंत्रिपदी वर्णी लागली, तर त्यांनी आतापर्यंत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी विचारलेले प्रश्न रद्द होतील. सोमवार १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी या तिघांनी आतापर्यंत सुमारे ४२५ प्रश्न सादर केले होते.
काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये गेल्यामुळे या आमदारांपैकी मंत्री होणाऱ्यांचे प्रश्न रद्द केले जातील. अन्य सात आमदारांचे प्रश्न विधानसभेत चर्चेला येतीलही; पण हे आमदार सत्ताधारी गटात केल्यामुळे त्यांच्या प्रश्नांवर चर्चा रंगण्याची शक्यता कमी आहे. अनेक प्रश्नांचा हेतूच आता साध्य होणार नसल्यामुळे काहीजण नाममात्र प्रश्न उपस्थित करू शकतात.
१७ जूनला राज्यपालांनी अधिवेशन बोलावल्याची अधिसूचना काढली होती. त्यानंतर एक-दोन दिवसांनी प्रश्न येण्यास सुरूवात झाली. ९ जुलैपर्यंत आमदारांनी शेकडो प्रश्न विचारले होते. दोन हजारांच्या आसपास प्रश्न पोहचले होते; पण आता मोठा बदल झाल्यामुळे मंत्री होणाऱ्या आमदारांचे प्रश्न रद्द केले जातील.
सभापती राजेश पाटणेकर यांना याविषयी विचारले असता जे दहा आमदार भाजपात दाखल झाले आहेत त्यातील कोणी जर मंत्री होत असेल तर त्यांनी विचारलेले प्रश्न रद्द होतील असे त्यांनी सांगितले.

अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षनेते म्हणून दरदिवशी १८ प्रश्न विधानसभेत पाठवणारे बाबू कवळेकर यांचे कालपर्यंत ३६०च्या आसपास प्रश्न आले होते. ते सर्व प्रश्न आता रद्द होतील. बाबूश मोन्सेरात यांचे दिवसाला एक ते दोन, तर फिलीप नेरी रॉड्रिग्स यांचे दोन ते तीन प्रश्न यायचे. या तिघांची मंत्रिपदी वर्णी लागली, तर त्यांनी विचारलेले सुमारे ४२५च्या आसपास प्रश्न कामकाजातून वगळले जातील. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा सचिवालयाने याविषयीची प्रक्रिया सुरू केली असून, शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्याला अंतिम स्वरूप मिळेल.