पक्षांतराला आव्हान देणार : डाॅ. चेल्लाकुमार


12th July 2019, 02:40 am


प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : गोव्यातील काँग्रेसचे १० आमदार एका रात्रीत भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसला जबरदस्त धक्का बसलेला आहे. ही राजकीय घडामोड एका रात्रीत झालेली नसून, आमदारांचा तो पूर्वनियोजित कट असण्याची दाट शक्यता आहे. या घडामोडींबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, मात्र आपण चौकशीसाठी येथे दाखल झालेलो आहे. तसेच बंडखोर आमदारांविरोधात सभापतींकडे आव्हान याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे गोवा प्रभारी निरीक्षक डाॅ. चेल्लाकुमार यांनी दिली. गुरुवारी मडगावात ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजप हा जातीयवादी पक्ष असून, त्या पक्षाने नैतिकता गमावली आहे. भाजपकडे राजकीय परिस्थिती व संकटाना सामोरे जाण्याची क्षमताच नाही. भाजपने पैशांच्या बळावर केवळ गोव्यातच नव्हे, तर देशभरातील सर्वच राज्यांत लोकशाहीचा खून करून सत्ता बळकावण्याचे सत्र आरंभले आहे, अशी टीकाही डाॅ. चेल्लाकुमार यांनी केली.

राज्यातील १० आमदारांनी अचानकपणे भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्ष भविष्यात नवीन नेतृत्व तयार करून पक्षाची पुनर्बांधणी करण्यास सक्षम आहे. मात्र भाजप हा नैतिकता गमावलेला पक्ष हे जगजाहीर झाले आहे.
- डाॅ. चेल्लाकुमार, गोवा प्रभारी निरीक्षक, काँग्रेस.