पर्ये-साखळी मार्गावर झाडांच्या पडझडीने वाहतुकीत अडथळा

पर्ये-साखळी मार्गावर झाडांच्या पडझडीने वाहतुकीत अडथळा


12th July 2019, 06:26 pm

पर्ये-साखळी मार्गावर झाडांच्या पडझडीने वाहतुकीत अडथळा

वार्ताहर । गोवन वार्ता

केरी-सत्तरी :

मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे पर्ये-सत्तरी ते साखळी या मार्गावर झाडे पडल्याने वाहतूक बराच वेळ खोळंबली हाेती. या रस्त्यावर समृद्धी नर्सरी जवळ व तुळशीमळ येथे आंबा व सिरसची झाडे पडली. त्यामुळे बराच काळ दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली.

दरम्यान, काही वाहन चालकांनी अग्निशामक दलाला संपर्क करून पाचारण केले. त्यानंतर डिचोली व वाळपई येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन्ही बाजूची झाडे काढून रस्ता मोकळा करून दिला. गुरुवारी दुपारी सुमारे २.३० वा. झाडे पडली होती. त्यामुळे दोन्ही​ बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. बेळगावला जाण्यासाठी चोर्ला घाट हा जवळचा मार्ग असल्याने अनेक वाहने याठिकाणहून जाणे पसंत करतात; पण गुरुवारी या रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे वाहन चालकांना खूपच त्रास सहन करावा लागला. अवजड वाहनांना या रस्त्यावरून बंदी असतानाही अनेक अवजड वाहने या रस्त्यावरून ये जा करत असताना अडकून पडली होती.

अग्निशामक दलाने सायंकाळी उशिरा झाडे बाजूला करून रस्ता मोकळा केला. या परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामळे ही झाडे कोसळली. रस्त्याच्या दुतर्फा अनेक जुनाट झाडे असून ती धोकादायक आहेत .ती कधीही काेसळण्याची भीती आहे.