तळपायांमुळे खुलते सौंदर्य...

Story: डाॅ. विक्रांत जाधव |
06th July 2019, 10:39 am
तळपायांमुळे खुलते सौंदर्य...

गेल्या दोन आठवड्यात आपण तळपाय स्वच्छ कसे ठेवावेत, त्यांची काळजी कशी घ्यावी, याविषयी पाहिले. आता आहार काय घ्यावा, ते पाहू.

अाहारीय कारणे
जास्त तिखट पदार्थ खाणे, अांबट पदार्थ खाणे त्यात दही, चिंच, कोरडे रुक्ष पदार्थ त्यात मुख्यत: भाताचा अभाव, दूध, तूप, लोणी ताक यांचा अभाव, सतत कोरडेच खात राहणे, मेथीच्या भाजीसारखे उष्ण, कैरी अधिक प्रमाणात खाणे, हिरव्या मिरचीचा मारा करणे, उकडलेली अंडी जास्त खाणे ही मुख्य कारणे. कारणांचा उल्लेख अाम्ही वैद्य लोकांना व्याधी वाढवणाऱ्या गोष्टी लोकांसमोर याव्यात म्हणून करतो. परंतु, एवढे करून बहुतांश लोक तो रोग असताना त्या- त्या गोष्टी खाऊन स्वत:ला अाजमावतात. हे कोडं अाजही मला सुटलेलं नाही. कारण शरीराला त्रास देणारे, सौंदर्य नष्ट करणाऱ्या गोष्टी अाहार- विहारातूनच बाजूला केल्या तर अर्धे कार्य तिथेच घडते. अौषधेही लवकर गुण दाखवतात. अधिक गारव्यात, जास्त वेळ पाण्यात काम करणे, अधिक उष्णतेत काम करणे ही विहारीय कारणे होय. जिभेचे चोचले पुरवायचे की पथ्य पाळून रोग बरा करायचा हे ठरविण्याचे स्वातंत्र्य रुग्णास अाहे.

चिखल्यांची चिकित्सा
 अनेक व्यक्तींना, खास करून पाण्यात काम करणाऱ्यांना पायाला भेगा पडायची समस्या असते. भेगा पडायला सुरुवात झाल्यास प्रथम जी कारणे असतील ती टाळावी. अाहारामधून जळवात वाढवणारे अाहारीय पदार्थ त्वरित काढून टाकावेत. तिथूनच ते बरे व्हायला सुरवात होईल. पायाला गार हवा लागणार नाही म्हणून सुती वस्त्रांचे मोजे घालावेत. त्याने त्वचेला चांगले अाच्छादन मिळते. ज्या चिखल्या जास्त व खोलवर असतील, त्या पूर्णपणे जाईपर्यंत अाच्छादन मिळते. अन्यथा त्या पुन्हा वाढण्याची शक्यता असते. चप्पल प्लास्टिकची टोचणारी किंवा त्वचेला हानी पोहोचवणारी नसेल हे पाहा. अापण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी बारीक माती, रेती पायात जाणार नाही याची काळजी घ्यावी. तिळाचे तेल लावून गरम पाण्याने दिवसातून ३-४ वेळेला पाय स्वच्छ धुवावेत. रात्री झोपताना पायाला लोणी, तूप अथवा मंजिष्टादी तेल, व्रणरोपक तेल इत्यादीचा अवस्थेप्रमाणे उपयोग करावा. नारळाच्या किशीने तळपाय नियमित घासून काढावेत, किशीने त्वचेला मृदुता येते व व्रण लवकर भरून येतात. अाहारीय पदार्थांमध्ये हळद- तूप- दूध रोज रात्री झोपताना घ्यावे. काळे खजूर, दुधी भोपळा, कोबी हे पदार्थ नियमित खावे. गाजर, बीट यांचाही उपयोग होतो. कैरी, लोणचे, बाजरी, ठेचा अाठवणीने टाळावा.
एकूण तळपायाकडे पाहून चेहऱ्याचे सौंदर्य खुलले पाहिजे. अशी काळजी अायुर्वेदाच्या सहाय्याने घ्या.  (समाप्त)

(लेखक आयुर्वेद डाॅक्टर आहेत.)