मूत्रपिंड रुग्णाचे भविष्य

मंत्र आरोग्याचा

Story: डाॅ. भिकाजी घाणेकर |
06th July 2019, 10:37 am
मूत्रपिंड रुग्णाचे भविष्य

मूत्रपिंडाचा आजार आता सर्वसामान्य झाला आहे. अनेकांना तो होतो. केवळ लघवीची तपासणी करून आता मूत्रपिंडाचा आजार होणार की नाही, हे समजेल, असे अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्या रुग्णाला डायलेसिसची आवश्यकता भासणार, त्या रुग्णाला हृदयाचा आजार होईल की नाही, हेही कळू शकेल, असा दावा त्यांनी केला आहे. रुग्णांच्या लघवीत एक हार्मोन्स असतो, त्यावरून हे निदान करता येईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
आपल्या देशात मूत्रपिंडाचे आजार वाढत आहेत, त्यामागचे कारण म्हणजे बाहेरचे खाणे. बहुतेक सर्व भारतीय रोज कुठल्या ना कुठल्या धाब्यावर, हाॅटेलमध्ये किंवा आॅनलाईन अन्न मागवून खात असतात. घरात स्वयंपाक करण्याचे प्रमाण झपाट्याने घटत आहे. अर्थात यामागे अनेक कारणे आहेत.
या अन्नाचा दर्जा चांगला नसतो, तसेच ते टिकावे, म्हणून त्यात रसायने (प्रिझर्व्हेटीव्ह) घातलेली असतात. त्यामुळे अलीकडच्या माणसांना पटकन आजार होतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे.
अनेकांनी पाणी पिण्याचेच सोडले आहे. किमान दोन लीटर पाणी रोज प्यायले पाहिजे. ताण- तणावही वाढले आहेत. मधुमेहामुळेही मूत्रपिंडाचे आजार वाढले आहेत. अरबट, चरबट खाण्यामुळे मधुमेह वाढतो. काहींना तो अनुवांशिकतेमुळे होतो. तरीही तो नियंत्रणाखाली ठेवण्याचे प्रयत्न आपण करायला हवेत. अलीकडे लोकांना झोपायला उशीर होतो. बहुतेक लोक ११.३० ते १२ वाजेपर्यंत जागे असतात. त्यामुळे झोप नीट होत नाही. हेही विविध आजार वाढण्याचे एक कारण.
मूतखडा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. जास्त काळ साठवून ठेवलेले अन्न, उदा. चिकन, मटण, पोर्क, बीफ वगैरेमुळे मूतखडा होऊ शकतो.
जहाजावर काम करणाऱ्यांना तर असलेच साठवलेले अन्न खावे लागते. त्यामुळे मूत्रपिंडाचा आजार होण्याचे हेही एक कारण असे शास्त्रज्ञांना वाटते. वरील सर्व कारणे टाळली, तर मूत्रपिंडाच्या विविध आजारांपासून दूर राहता येईल. वर म्हटल्याप्रमाणे आधीच ते कळले, तर काळजी घेता येईल.

(लेखक निवृत्त आरोग्य संचालक आहेत.)