बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानचा सामना

04th July 2019, 02:01 Hrs

लंडन :आयसीसी विश्वचषक २०१९च्या ४३व्या सामन्यात पाकिस्तान व बांगलादेश आमने - सामने येणार आहेत. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बांगलादेशचे विश्वचषक अभियान संपुष्टात आले होते तर पाकिस्तानचा प्रवासही संपुष्टात आल्यात जमा आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला ३११ किंवा जास्त धावांच्या फरकाने विजय महत्त्वाचा आहे.
एवढ्या मोठ्या फरकाने पाकिस्तानने जर विजय मिळवला तर त्यांचे नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा जास्त होईल व पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. मात्र ही गोष्ट जवळपास अशक्यप्राय होणार आहे. शिवाय नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तरी पाकिस्तानचा विश्वचषकातील प्रवास अधिकृतरित्या संपणार आहे.
पाकिस्तान व बांगलादेश यांच्यामधील हा सामना लंडनच्या लॉर्डस् मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सामन्याची सुरुवात भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३ वाजता होणार आहे. पाकिस्तानने या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता तर ऑस्ट्रेलियाने इंग्लंड व न्यूझीलंडला नमवले होते. या सामन्यांमध्ये डावखुऱ्या गोलंदाजांना चांगलीच मदत मिळाली होती. मिशेल स्टार्क व जेसन बेहरनडर्फने शानदार गोलंदाजी केली होती. शिवाय ट्रेंट बोल्टने हॅटट्रिकही केली होती.
पाकिस्तानच्या संघात महम्मद आमिरसह तीन डावखुरे गोलंदाज आहेत तर बांगलादेशच्या संघात भारताविरुद्ध ५ गडी बाद करणारा मुस्तफीजूर रहमानचा समावेश आहे. या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता कमीच आहे मात्र दोन्ही संघ विश्वचषकाची अखेर विजय ​मिळवून करण्याचा प्रयत्न करतील.

Top News

कर्नाटकचे मंजुरीपत्र; नियोजित डावाचा संशय

म्हादई : वन, वन्यजीव परवान्यासाठी कर्नाटकची सल्लागार नियुक्ती निविदा Read more