स्वीडनला नमवत नेदरलँड अंतिम फेरीत


04th July 2019, 02:01 pm
स्वीडनला नमवत नेदरलँड अंतिम फेरीत

लियोन :नेदरलँडने जॅकी ग्रोनेनने नोंदवलेल्या अतिरिक्त वेळेतील गोलाच्या जोरावर उपांत्य सामन्यात स्वीडनचा १-० गोलने पराभव करत फिफा महिला फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत त्यांचा सामना आता गतविजेत्या अमेरिकेशी होणार आहे.
निर्धारित ९० मिनिटांमध्ये गोलविरहीत सामना झाल्यानंतर मिडफिल्डर व ज्युदो युरोपियन चॅम्पियनशिपची माजी कांस्य पदक विजेती ग्रोनेनने तणावपूर्ण सामन्यात ९९व्या मिनिटाला गोल करत स्वीडनचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न धुळीत मिळवले. ग्रोनेनने डेनियली वान डी डोंकच्या पासवर गोलट करत आपल्या संघाला अंतिम फेरीत नेऊन ठेवले.
मागच्या दोन फेऱ्यांमध्ये इटली आणि माजी विजेता जपानला बाहेर करणारा नेदरलँडचा संघ प्रथमच विश्वचषकावर नाव कोरण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. या संघाने यजमान म्हणून यूरो २०१७ किताब जिंकला होता. हा संघ आपला केवळ दुसराच विश्वचषक खेळत आहे.
अमेरिकेने मंगळवारी इंग्लंडचा २-१ गोलने पराभव करत विश्वचषकात सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. शनिवारी तिसऱ्या स्थानासाठी प्लेऑफमध्ये स्वीडनचा सामना इंग्लंडशी होणार आहे.