पी. कश्यप, सौरभ उपउपांत्यपूर्व फेरीत


04th July 2019, 02:00 pm
पी. कश्यप, सौरभ उपउपांत्यपूर्व फेरीत

कालगॅरी :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील माजी चॅम्पियन पी. कश्यप व राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्माने येथे ७५ हजार डॉलर बक्षीस रकमेच्या कॅनडा ओपन सुपर १०० टुर्नामेंटच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
सहावे मानांकन प्राप्त कश्यपने फ्रान्सच्या लुकास कोरवीचा २१-१२, २१-१७ने पराभव केला तर सौरभने आणखी एका पुरुषांच्या एकेरी सामन्यात कॅनडाच्या बी. आर. संकीर्थवर २१-१४, २१-११ने मात केली. यावर्षी इंडिया ओपनच्या उपांत्य सामन्यात पोहोचणाऱ्या कश्यपचा सामना आता चीनच्या रेन पेंग बो याच्याविरुद्ध होणार आहे तर २६ वर्षीय सौरभची लडत चीनचा आणखी एक खेळाडू सुन फेई जियांगशी होईल.
इतर भारतीयांमध्ये अजय जयराम, एच. एस. प्रणय व लक्ष्य सेन यांचे पराभवाबरोबर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. जयरामला २०१० राष्ट्रकुल खेळांमधील रौप्यपदक विजेता राजीव ओसाफने २१-१९, २१-१७ने पराभूत केले. तिसरे मानांकन प्राप्त प्रणयला जपानच्या कोकी वाटानाबेने ३४ मिनिटांत २१-१६, २१-१०ने नमवले. लक्ष्यला चीनच्या वेंग होंग यांगने २१-७, २१-१३ने पराभूत करत स्पर्धेबाहेर केले.