संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा


25th June 2019, 07:05 pm

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : व्यावसायिक वादातून बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणाऱ्याकडूनच संशयिताला पकडण्यासाठी हणजूण पोलिसांनी विमान प्रवासाचे तिकीट घेतल्याची कबुली पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ५ जुलै रोजी होणार 

आहे.

पोलिस महानिरीक्षकांचे प्रतिज्ञापत्र

याचिकादाराने खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर सोमवारी पोलिस महानिरीक्षकांनी प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांचे म्हणणे मांडले. याचिकादाराने म्हटल्याप्रमाणे पोलिसांनी कोणतीही रितसर परवानगी न घेता तक्रारदाराने काढलेले विमानाचे तिकीट वापरले, हे खरे आहे. मात्र, त्यामागे मुंबईत लवकर पोहोचावे, हा शुद्ध हेतू होता. तसेच तक्रार खोटी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संशयितावरील गुन्हे मागे घेऊन तक्रारदार अनिल जयसिंघानी आणि तुलिका कातारे यांच्या विरुद्ध खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केले आहे, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

दरम्यान, याचिकादार केवशवानी यांनी आपल्या याचिकेत हणजूणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. तसेच तत्कालिन उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी तक्रारदारांच्या संगनमताने आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंदवलाल्याचे म्हटले आहे. संबंधित प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणीही त्यांंनी केली आहे. परंतु हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास पोलिस महानिरीक्षक सिंग यांनी नकार दिला आहे.

काय होते प्रकरण?

मुंबई येथील व्यावसायिक किशोर केशवानी यांनी खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेनुसार, बुकी अनिल जयसिंघानी याने याचिकादाराच्या विरोधात व्यावसायिक वैमनस्यातून हणजुणे पोलिस स्थानकात २०१६ मध्ये कथित बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन हणजूणे पोलिसांनी याचिकादार केशवानी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तक्रारदारानेच संशयित मुंबईत असल्याची माहिती देऊन पोलिसांना विमानाची तिकीट काढून दिली होती. त्यानंतर झालेल्या तपासात ती तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाले होते.